त्या नरपिशाच्चाने चिमुकल्या मुलीसमोरच कुऱ्हाडीने पत्नीचे मुंडके कापले

181

5ग्लोबल गडचिरोली न्यूज,

कोरची, ता. २९ : एखाद्या व्यक्तीमध्ये भयंकर नरपिशाच्चही दडलेला असतो हे कोरची येथील घटनेतून पुढे आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या अवघ्या पाच वर्षांच्या निरागस चिमुकल्या मुलीच्या समोरच पत्नीचे मुंडके कुऱ्हाडीने कापून धडावेगळे केले.

तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे मंगळवार २८ मे रोजी रात्री ३ वाजताच्या दरम्यान पत्नी आणि ५ वर्षांची मुलगी झोपेत असताना पती रोहिदास बंझार याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने ३ वेळा वार करून तिचे डोके धडापासून वेगळे केले. विशेष म्हणजे त्याने ५ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत हे भयंकर कृत्य केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. दरम्यान आरोपी रोहिदास बंझार याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत अमरोतीन बंझार (वय ३३) आणि रोहिदास बंझार (वय ३८) यांचे २००९ ला लग्न झाले. त्यांना ४ मुली असून नवव्या वर्गात असलेली सर्वांत मोठी मुलगी ही घटनेवेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती. मधल्या दोन मुली आपल्या आजीकडे झोपून होत्या. मात्र लहान मुलगी आरोपी रोहिदास व तिच्या आईसोबत झोपून होती. यापूर्वीसुद्धा रोहिदास आपल्या पत्नीला मारझोड करतो म्हणून ४ वर्षापूर्वी बेतकाठी येथे गावात बैठक घेऊन त्याची समजूत काढण्यात आली होती. परंतु कुठला तरी राग मनात धरून त्या नराधमाने आपल्या पत्नीला लहानश्या चिमुकलीच्या समोरच कुऱ्हाडीने वार करत क्रूरतेने ठार केले. या घटनेनंतर आरोपी रोहिदास बंझार याने आपली कुऱ्हाड लपविली होती. ती कुऱ्हाड कुठे लपविली हे त्या लहान चिमुकलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपी रोहिदास बंझार याला अटक केली असून पुढील तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. काही महिन्यापूर्वी आरोपी रोहिदास बंझार बोअरचे काम करण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता तिथे त्याने आपल्या मालकालासुद्धा मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मनात सैतान संचारलेल्या नराधम रोहिदास बंझारने पत्नीचा खून करताना भयभित नजरेने पाच वर्षांची त्याचीच पोटची लेक बघत असतानाही त्याचे हात थरथरले नाहीत. उलट तो त्या चिमुकलीलाही मारून टाकायची धमकी देत होता. पत्नीचा खून करून रोहिदास जेलमध्ये गेला. मात्र त्याच्या सैतानी कृत्याने त्याच्याच चार मुलींचे मातृ-पितृ छत्र हरवले आहे.