बंद पडलेले पथदिवे आठ दिवसांत दुरुस्त करा

89

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १५ : गेल्या चार-पाच महिन्यांपासून चामोर्शी महामार्गाच्या दुभाजकावरील पथदिवे बंद पडल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे आठ दिवसांत हे पथदिवे दुरुस्त कराअन्यथा राष्टीय महामार्ग कार्यालय व नगर परिषद कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्गाचे प्रभारी कार्यकारी अभियंता गोबडे व नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक महेश गेडाम यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली व येत्या आठ दिवसांत बंद पडलेल्या पथदिव्यांची समस्या सोडविण्यात यावी अशी मागणी करून समस्या मार्गी न लागल्यास कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, महामर्गावरील पथदिव्यांचा विषय कोणत्या विभागाच्या देखरेखीखाली येतो याच्याशी नागरिकांचा काहीही संबंध नाही. दोन विभागांनी जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यापेक्षा आपसांत ठरवून घेऊन नागरिकांची होत असलेली गैरसोय तत्काळ थांबवण्यासाठी उपाययोजना करवी व पथदिव्यांची समस्या मार्गी लावावी. अन्यथा आठ दिवसांत घेराव आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, युवक आघाडीचे उपाध्यक्ष कवडू दुधे, भोजराज रामटेके, तालुका उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, शहर संघटक भारत रायपूरे, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे आदीचा समावेश होता.

——————————