ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून २१ जून रोजी सकाळी ८ वाजता प्रकल्पाच्या सर्व ३८ दरवाजांतून १९०. २३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. म्हणून या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
गोसीखुर्द धरणातून ४० घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने २९ जून २०२४ पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा १७९. ९०० मी. पर्यंत वाढेल, त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. हा बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजुस ४ किलोमीटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी ६९१ मीटर असून त्यावर १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये मंगळवार (ता. १८) पाणी पातळी १७९. ९० मी. व पाणीसाठा ११. २८५ द.ल.घ.मी. इतका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ आदी गावांना धोका संभवतो, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावकऱ्यांनी या कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना योग्य सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातून रेती काढणारे, पशूपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.









