भटपारच्या ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी करतानाच पोलिसांचे प्राणही वाचवले

89

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : मागील १४ जून रोजी धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सात गावांना माओवाद्यांना गावबंदी केली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेत येथीलच भटपारच्या ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली. एवढेच नव्हे तर एक पाऊल पुढे जात माओवाद्यांना पोलिसांचा घातपात करण्यासाठी पेरून ठेवलेले स्फोटक साहित्यही पोलिसांना सुपुर्द करत पोलिसांसोबत होऊ शकणारा मोठा अनर्थ टाळून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

पोलिस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी माओवाद्यांनी आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले होते. परंतू गडचिरोली पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आदींच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलिस दलाच्या प्रती येथील ग्रामस्थांचा विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे माओवाद्यांचा सुरक्षा रक्षक दलास नुकसान पोहचविण्याचा व घातपात करण्याचा कोणताही मनसूबा यशस्वी होऊ शकला नाही. गुरुवार (ता. २०) धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भटपार गाव आहे. जंगल परीसरातील घोटपाडी पहाडीजवळ माओवाद्यांनी सुरक्षा रक्षक दलास नुकसान व घातपात करण्याच्या उद्देशाने खड्डा करून त्यात लावलेल्या लोखंडी टोकदार सलाखी (Spikes) तसेच कुकरमध्ये ठेवलेले आयडीसदृश वस्तू, वायर व बॅटरी भटपार गावातील नागरिकांनी स्वतः पोलिस स्टेशनला येऊन जमा केल्या. सोबतच आ ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव धोडराज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केला. यापुर्वीही १४ जून रोजी धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सात गावांतील नागरिकांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव धोडराज पोलिस स्टेशन येथे सादर केला होता. या कार्यवाहीत भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, धोडराज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. माओवाद्यांना गावबंदी करत ठराव संमत करणारे भटपार येथील नागरिकांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून अतिदुर्गम भागातील इतर गावांतील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे. गडचिरोली पोलिस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्यास माओवादीमुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी, असे आवाहन केले. माओवाद्यांना गावबंदी करणारी गावे वाढत असून आणखी काही गावे असाच ठराव संमत करू शकतात.