लंडनच्या जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर अॅड. बोधी रामटेके यांनी केली मांडणी

101

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली. ता. २७ : लंडन येथे नुकत्याच जागतिक ‘मानववंशशास्त्र व शिक्षण’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव येथील गोंडी शाळेवर चर्चा झाली. अॅड. बोधी रामटेके यांनी या परीषदेत मोहगावातील गोंडी शाळेची सविस्तर माहिती दिली.

या परीषदेत विविध विषयांवरील संशोधन सादर करण्यासाठी जगभरातील अभ्यासक उपस्थित होते. भारतासारख्या पूर्ववसाहती देशात अस्तित्वात असलेल स्वतंत्र भारतातील शैक्षणिक धोरणे आदिवासी समाजाच्या गरजा लक्षात न घेता त्यांच्यावर सरसकट थोपवल्या आहेत, ज्यामुळे आदिवासी समाज त्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरेपासून दूर केला जात आहे. भाषा, संस्कृती नष्ट होणे म्हणजे, त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येणे होय. ‘मागास, असंस्कृत किंवा जंगली’ असा आदिवासी समाजाबद्दलचा दृष्टीकोन, अद्याप कायम आहे, असे मत या परिषदेत अॅड.रामटेके यांनी मांडले. पुढे आदिवासी समाजाला पूरक नसलेल्या शैक्षणिक धोरणांना आव्हान देत आदिवासी विकासासाठी एक आदर्श शैक्षणिक प्रणाली म्हणून गडचिरोलीच्या मोहगावातील गोंडी शाळा कशाप्रकारे उभी राहिली,याची माहिती दिली. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे २०१९ मध्ये ग्रामसभांनी एकत्रित येऊन ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध गोटूल’ या शाळेची स्थापना केली. ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात गोंडी भाषेत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. संविधानातील अनुच्छेद ३५० (अ) अन्वये मातृभाषेत शिक्षण देण्याबाबतची जबाबदारी शासन व्यवस्थेवर सोपावली आहे. या सोबतच ग्रामसभांना पेसा किंवा वनहक्क कायद्याअंतर्गत त्यांची संस्कृती, भाषा संवर्धन करण्याचासुद्धा अधिकार आहे. ज्याचा वापर करत ही शाळा अस्तिवात आली. अधिकारांच्या कक्षेत राहून सुरू असलेल्या शाळेला २०२२ मध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अवैध किंवा अनधिकृत’ ठराविण्यात आले शाळेला स्थापनेपासून अवैध ठरविल्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याबाबतच्या एकूणच संघर्षाबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. पुढे अॅड. रामटेके म्हणाले की, कॅनडा व जगभरातील अभ्यासकांनी अनेक दाखले देत सिद्ध केले आहे की, सांस्कृतिक वातावरणात, मातृभाषेतून शिक्षण दिल्यास त्या समाजाचा एकंदरीतच विकास होतो. परंतु तसे न करता शाळेला अनधिकृत ठराविणे असंवैधानिक असल्याचे मत अॅड.रामटेके यांनी मांडले. मोहगाव ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे, शिक्षक शेषराव गावडे व इतर सदस्य, शिक्षकांचा परिषदेत उल्लेख झाला. गोंड आदिवासी समाजाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाची जगभरातील अभ्यासाकांनी प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.