आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे विधानसभेत मागणी
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेवून जिल्ह्यातील विविध समस्यांना फोडली वाचा
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिंनाक १ जुलै मुंबई
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली मात्र अजूनही जुनी पेन्शन सुरू लागू करण्यात आली नाही. कर्मचारी आपले अधिकाधिक आयुष्य शासकीय सेवेत देतात. मात्र निवृत्त झाल्यानंतर पेन्शन न मिळाल्यास त्यांना व त्यांच्या परिवारांना मोठा संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करणे आवश्यक आहे करिता राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या व १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या माध्यमातून विधानसभेत केली.
राज्य सरकारने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून विविध योजनांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध दिला. त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले. मात्र आणखी काही महत्वाच्या समस्या मार्गी लावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विकासापासून दूर असलेल्या जिल्ह्यांसाठी डेव्हलपमेंट इंडेक्स तयार करून त्या दृष्टीने पुढील राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये डेव्हलपमेंट इंडेक्स च्या यादीतील मागास जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल झोन निर्माण करण्याची आहे. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल. २० हजार कोटींचा करार करून गडचिरोली जिल्ह्याला मोठा रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. गडचिरोली येथे २ नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले.
मेडिकल कॉलेज मंजूर केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानीत त्यांनी २०२४ पासून १०० मेडीकल विद्यार्थ्यांची बॅच सुरू करावी अशी मागणी केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांचा निधी दिला जातो त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनाही देण्यात यावा अशी विनंती शासनाला केली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार करताना गडचिरोली नागपूर अशी घोषणा केली होती मात्र त्या संदर्भात कारवाई सुरू झालेली नाही . त्यामुळे घोषणेप्रमाणे नागपूर गडचिरोलीपर्यंत हया महामार्गाचा विस्तार करावा अशी विनंती त्यांनी या माध्यमातून केली. जलयुक्त शिवार -२ या टप्प्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करावा . वसा पोर्ला उपसा सिंचन योजना व राजीव उपसा सिंचन योजना भेंडाळा यांना मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली. इंटरनेट कनेक्टिव्हिटी मुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असणारी मा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना देताना गरजूंना लाभ मिळेल याची काळजी घ्यावी अशी मागणी केली.









