गडचिरोली, ता. २ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी या गावात नव्यानेच स्थापन केलेल्या शाखेत आयोजित कार्यक्रमात ग्राहक व नागरिकांशी संवाद साधला. अतिदुर्गम भागातील लोकांना बँकींग सुविधा व डिजीटल सुविधा उपलब्ध करून दिली असून हेडरी व परिसरातील नागरिकांनी बँकींग सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हेडरी येथे ग्राहकांकरीता आयोजीत ग्राहक संवाद या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हेडरी या गावात बँकेच्या ५६ व्या शाखेचा प्रारंभ केला. हेडरी येथे बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे हेडरी व परिसरातील ४० गावांतील लोकांना बँकेची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. बँकेने येथे ग्राहकांकरिता ए.टी.एम., मोबाईल बँकींग, यूपीआय, क्यूआरकोड, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. व पासबुक प्रिंटींग मशीनसारख्या अत्याधुनिक सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेने हेडरी व परिसरातील लोकांच्या अडीअडचणी व त्यांच्या सूचना घेण्याच्या दृष्टीने ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी हेडरी व परिसरातील ग्राहक व लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटडचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व त्यांनी केलेल्या सबचना जाणुन घेतल्या. या कार्यक्रमाला लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लि. सुरजागडचे सहायक संचालक अरुणकुमार रावत यांनी गडचिरोली जिल्हा बँकेची शाखा सुरु झाल्यामुळे गावांतील लोकांसोबतच लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जीचे अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा बँकेच्या अत्याधुनिक सुविधेचा लाभ होत असल्याचे सांगितले. प्रास्तावीक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून हेडरीच्या सरपंच अरुणा शेडमेक, उपसरपंच राकेश कवडो, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, हेडरी पोलीस स्टेशनचे प्रमुख सुनील दौंड, दत्तात्रेय बाराते, लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जीचे सहायक संचालक साई कुमार, सत्या राव, दिलीप बुरांडे, सत्यवान कलसे, देवू कवडो .बँकेचे अधिकारी राजु सोरते, किरण सांबरे, शाखा व्यवस्थापक राजु मुद्दमवार, शरद भन्नारे आदी उपस्थित होते.









