ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : आपल्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी गट प्रवर्तकांनी आयटकच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयावर १० जुलै रोजी धडक छत्री मोर्चा काढला.

आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संलग्न आयटक संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन राज्य सचिव झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र नारेबाजी करत छत्री मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. मोर्चानंतर आशा वर्कर, गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना दिले. तसेच स्थानिक मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा, प्रस्ताव त्वरीत राज्य व केंद्र सरकारने मंजूर करावा, राज्य शासनाने आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात गट प्रवर्तकाना १० हजार रुपये, मानधन वाढ, २ हजार रुपये, दिवाळी बोनस निर्णयाचा जीआर काढावा, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणारा मोबदला एप्रिल २०२० ते आॅक्टोबर २०२२ पर्यंत आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना दरमहा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता थकीत आहे तो त्वरित द्यावा, आॅनलाइन कामाची सक्ती करणे बंद करावे, गट प्रवर्तक व आशा वर्करला त्वरीत सामाजिक सुरक्षा देऊन किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती पगारी रजा, भविष्य निर्वाह निधी लागू करा, गट प्रवर्तकांना हजेरीसाठी जीपीएस सक्ती करू नये, नोव्हेंबरपासून राज्य सरकारने पाच हजार रुपये मानधन वाढ लागू केली आहे ती त्वरित द्यावी, संप काळातील कपात केलेले मानधन त्वरित द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व आयटक नेते विनोद झोगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव सरीता नैताम, रजनी गेडाम, संगीता मेश्राम, माधुरी कोरटला, माया कांबळे, सरीता गेडाम, हेमा मोहुरले, दीपिका गुरनुले, शारदा रणदिवे, रुख्सार शेख, तीलोत्तमा भानारकर, निर्मला जंनबंधू, गोपिका रोहनकार, विद्यादेवी येजुलवार, समक्का जनगाम, सोनाली ठाकरे आदींनी केले. यावेळी जिल्हाभरातील हजारो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी छत्री घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
————————-









