पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी झोपेतून उठवून त्याला ठार केले

117

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३१ : शहीद सप्ताहादरम्यान माओवाद्यांनी भामरागड तालुक्यातील मिळगुडवंचा या दुर्गम गावातील लालू मालू धुर्वा (वय ५०) या ग्रामस्थाची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. ही घटना बुधवार (ता. ३१) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार मंगळवार (ता. ३०) रात्री सशस्त्र माओवाद्यांनी गावात येत लालू धुर्वा याच्या घरात प्रवेश केला. त्याला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि त्यानंतर त्याची हत्याकेली. माओवाद्यांनी लालू धुर्वाच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी टाकली. त्याच्या माहितीवरून एकदा आम्हाला कॅम्प सोडून पळून जावे लागले.त्यामुळे संधी मिळताच त्याची हत्या केली, असे माओवाद्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. तसेच या चिठ्ठीवर पिपल्स लिबरेशन गुर्रीला आर्मी असा उल्लेख आहे. २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान माओवादी शहीद सप्ताह साजरा करतात. २५ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे याची माओवाद्यांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केली होतीी. त्यानंतर आता लालू धुर्वा याची हत्या केली आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या पराभवाच्या नैराश्यातून माओवादी निरपराध नागरिकांची हत्या करत असून आपण या परीसरात माओवादविरोधी अभियान तीव्र केल्याची माहितीही त्यांनी दिली.