वाहनाच्या धडकेत निवृत्त अभियंत्याचा मृत्यू

176

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : शहरातील लांझेडा वॉर्डातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बुधवार (ता. ४) रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने जलसंधारण विभागाचे निवृत्त उपविभागीय अभियंता साईनाथ दुम्पेट्टीवार (वय ५९) जागीच ठार झाले.

साईनाथ दुम्पेट्टीवार हे गडचिरोली येथील कॅम्प एरीया परिसरात राहत होते. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ते स्कुटीने लांझेडा येथून घराकडे परतत असताना गडचिरोलीहून इंदिरानगरच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच ३३ एसी ४५३३) वाहनाने त्यांच्या स्कुटीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुम्पेट्टीवार यांना त्या चारचाकी वाहनाने तब्बल ७० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक आणि वाहनातील अन्य व्यक्ती फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगडजुडे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार भास्कर सेलोटे पुढील तपास करत आहेत. मृत साईनाथ दुम्पट्टीवार हे जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता पदावरून २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. राज्य शासनाने त्यांचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे.