छत्तीसगडच्या चकमकीत खात्मा
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४ : तब्बल तीन राज्यांत सक्रिय असलेला आणि गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा हिंसक कारवाया करणारा माओवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य आणि कंपनी १० चा कमांडर रूपेश मडावी छत्तीसगड राज्यात २३ सप्टेंबर २०२४ रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे.
सोमवारी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका महिलेसह तीन माओवादी ठार झाले. यात रूपेशचा समावेश आहे. त्याच्यावर तीन राज्यांत ७५ लाखांहून अधिक बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीतील प्रमुख माओवादी नेता म्हणून त्याची ओळख होती. प्राप्त माहितीनुसार सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ असलेल्या सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करकनगुडा, अबुझमाड जंगल परिसरात मोठ्या संख्येने माओवादी असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली. यावरून डीआरजी, बस्तर फायटर आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी या परिसरात संयुक्त माओवादविरोधी अभियान राबविले. दरम्यान, पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. ही चकमक जवळपास चार तास सुरू होती. घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवादी पळून गेले. चकमक स्थळी पोलिसांनी शोध घेतला असता रात्री उशिरा तीन माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मंगळवार (ता. २४) सकाळी मृत माओवाद्यांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये रूपेश मडावी (वय ४७) आणि माओवाद्याचा माड एरिया तांत्रिक विभागीय समितीचा सदस्य असलेला जगदीश याचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेली २५ वर्षे गडचिरोलीच्या माओवादी चळवळीत सक्रिय असलेला रूपेश अहेरी तालुक्यातील देचलीपेठा पोलिस हद्दीत येणाऱ्या शेडा या गावातील रहिवासी होता. त्याच्यावर खून, जाळपोळीसह ७० हून अधिक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तीन राज्यांत ७५ लाखांहून अधिक बक्षीस होते.चकमकीतील मृत महिला माओवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. रूपेश मडावी ठार झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी माओवाद्यांच्या दंडकारण्य विभागीय समितीचा सदस्य आणि कंपनी दहाचा प्रमुख जहाल माओवादी नेता गिरीधर याने सपत्नीक आत्मसमर्पण केल्यानंतर रूपेश मडावी व प्रभाकर स्वामी या दोन जहाल माओवाद्यांवर गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, रूपेश छत्तीसगडच्या चकमकीत ठार झाल्याने गडचिरोलीत माओवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती आणि कंपनी दहाची संपूर्ण जबाबदारी प्रभाकर स्वामीकडे आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता तिन्ही राज्यांतील सुरक्षा यंत्रणांचे लक्ष प्रभाकर स्वामीवर केंद्रीत होणार आहे.
————————————————————–