ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली), ता. ६ : जिल्ह्यातील दळणवळणाच्या सुविधांची लक्तरे वारंवार वेशीवर टांगली जात असून अशी एक घटना एटापल्ली तालुक्यातील धोबेगुडा गावात घडली. गावापासून जवळच वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम झालेले नसल्यामुळे शनिवारी ५ आॅक्टोबर रोजी एका गर्भवती महिलेला खाटेच्या कावडीत ठेवून आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांनी खळाळून वाहणारा हा नाला पार केला. राजे मुन्शी झोरे (वय ३३) असे या महिलेचे नाव आहे. सुदैवाने या महिलेची प्रसूती सुखरूप झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
तालुक्यातील धोबेगुडा येथील राजे मुन्शी झोरे ही गर्भवती महिला घरी असताना तिला शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. ही माहिती येथील आशा वर्कर संगीत गेडाम यांना कळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ वानखडे यांना भ्रमणध्वनीवरून सगळी माहिती सांगितली. त्यांनी तत्काळ कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागवून धोबेगुडा गावाला घेऊन येण्यास निघाले होते. मात्र धोबेगुडा गावाशेजारी नाल्यावर पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका गावापर्यंत पोहचू शकत नव्हती. त्यामुळे डॉ. सौरभ वानखेडे, आरोग्य सेविका रोशनी बेसरा, आशा वर्कर संगीता गेडाम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गर्भवतीला खाटेच्या कावडीत झोपवून पुराच्या पाण्यातून चालत दीड किमी प्रवास करत दुसऱ्या तीरावर असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवले. येथून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असलेल्या एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रथम अहेरी, नंतर गडचिरोली व त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. सुदैवाने रविवार (ता.६) सकाळी तिची सुखरूप व सामान्य प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. प्रसूतीनंतर ती व तिचे बाळ सुदृढ असून दोघांचीही तपासणी करून योग्य उपचार केले जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कन्नाके यांनी दिली आहे. यापुर्वीही जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी १८ जुलैला भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील गरोदर मातेला नाल्याच्या पुरामुळे जेसीबीच्या बकेटमधून जीवघेणा प्रवास करावा लागला होता, तसेच १० सप्टेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील लांजी येथील गरोदर मातेला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला होता. त्यामुळे अशा घटना यापुढे घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
———————————————-









