ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सोमवार (ता. ७) गडचिरोली जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक वडसा रेल्वे स्थानकावरून विशेष वातानुकुलीत रेल्वेगाडीने अयोध्येला मार्गस्थ झाले. 
आमदार कृष्णा गजबे व सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, उपायुक्त मधुसूदन धारगावे, तहसीलदार प्रिती डुडुलवार प्रामुख्याने उपस्थित होते. साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात कोल्हापूर,जळगाव,मुंबई व भंडारानंतर तीर्थदर्शनाची रेल्वे सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातून रवाना झाली. तीर्थदर्शनाला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ‘जय श्रीराम’ च्या जयघोषाने वडसा रेल्वेस्थानक परीसर दणाणून सोडला होता. सामाजिक न्याय विभागाद्वारे ढोलताशात व पुष्पहाराने प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आमदार गजबे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रति जिल्हा प्रशासनाच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले. तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत नाश्ता, जेवण, औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे व त्यांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे आणि रेल्वेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे समाजकल्याण विभागाचे डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले. रेल्वेस्थानकावर विविध विभागाचे अधिकारी, समाजसेवक तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि तीर्थदर्शनासाठी निघालेल्या नागरिकांना निरोप देण्यासाठी जमलेले त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातून तब्बल ८०० भाविक भक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला देसाईगंज (वडसा)येथील रेल्वे स्थानकावरून भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडीने सकाळी ११.३० वाजता रवाना झाले आहेत. रेल्वे स्थानकावर जमलेल्या भाविक भक्तांचे आमदार कृष्णा गजबे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे लोकसभा निवडणुक प्रमुख किसन नागदेवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते, विधानसभा विस्तारक रोशन ठाकरे, माजी नगराध्यक्ष श्याम उईके, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, ज्येष्ठ नेते मुरलीधर बुद्धे,जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचे सागर नाकाडे,आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भाविक भक्तांना विश्वनाथ मंदिर दर्शन,वाराणसी दर्शन घडवून ९ ऑक्टोबर रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे दर्शन घडवण्यात येणार आहे. अयोध्येकडे रवाना होण्यासाठी आलेल्या भाविकांचे रेल्वे स्थानकावर श्रीराम तसेच माता सीतेच्या वेशभुषेतील कलावंतांनी स्वागत करून सुखमय प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.









