पित्याशी बंडखोरी भाग्यश्री आत्राम यांना लाभली, मिळाली उमेदवारी

147

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या तथा माजी जिल्हा परीषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना पित्याशी केलेली बंडखोरी लाभदायक ठरली आहे. त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून अहेरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांचे सुरवातीपासूनच विधानसभेसाठी प्रयत्न सुरू होते. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून धर्मरावबाबांना उमेदवारी मिळेल व पुढे अहेरी विधानसभेची उमेदवारी भाग्यश्री आत्राम यांना मिळेल, असे ठरल्याचे कळते. पण लोकसभेत भाजप अडून बसल्याने धर्मरावबाबांचे लोकसभेचे तिकीट कटले. पर्यायाने भाग्यश्री आत्राम यांची विधानसभेची वाट बिकट झाली होती. वडील धर्मरावबाबा अहेरी विधानसभेची उमेदवारी सोडणार नाहीत हे पक्के लक्षात आल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाला साकडे घातले. महिनाभरापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. अहेरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक दावा राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आग्रही असताना देखील शरद पवार गटाकडून गुरुवार (ता. २४) जाहीर करण्यात आलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत भाग्यश्री आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मंत्री आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात होते. परंतु त्यांना डच्चू देण्यात आला. त्यामुळे ते नागविदर्भ समिती, वंचित बहुजन आघाडीकडून किंवा अपक्ष लढतील अशी शक्यता आहे. मात्र भाग्यश्री आत्राम यांचे प्रयत्न यशस्वी झाले असून राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता अहेरी विधानसभेत वडील विरूद्ध कन्या असा सामना बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वांचे लक्ष येथील अनोख्या लढतीकडे राहणार