Home मराठी माजी आमदार हरिराम वरखडे तसेच जिल्हा परिषदेचे सभापती रमाकांत ठेंगरी यांचे निधन

माजी आमदार हरिराम वरखडे तसेच जिल्हा परिषदेचे सभापती रमाकांत ठेंगरी यांचे निधन

118

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३ : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरीराम वरखडे तसेच जिल्हा परीषदेचे माजी सभापती रमाकांत ठेगरी यांचे निधन झाले.

माजी आमदार हरीराम वरखडे यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे उपचारादरम्यान शनिवार (ता. २) रात्री ९ वाजतादरम्यान निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सुरवातीला शिक्षकी व्यवसायात असताना त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने झाडीपट्टी रंगभूमीही गाजवली. वरखडे गुरूजी म्हणून ते सर्वत्र लोकप्रिय होते. त्यामुळे १९९० मध्ये शिवसेनेने त्यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्यावेळी ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पुढे १९९२ मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. कुरखेडा, कोरचीसह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात त्यांनी गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. मात्र पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविले होते. यादरम्यान त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी रामपुरी मार्गावरील गाढवी नदीच्या तिरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरखडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नात व बराच मोठा आप्त परिवार आहे. तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती रमाकांत ठेंगरी यांचेही अल्प आजाराने निधन झाले. रमाकांत ठेंगरी यांच्यावर रविवारी त्यांचे मूळ गाव देसाईगंज तालुक्यातील मोहटोला येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परीषदेचे माजी सभापती रमाकांत ठेंगरी ओबीसी समाज संघटनेचे मार्गदर्शक तसेच युवक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या दोघांचेही निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

———————————