विधानसभा निवडणुकीसाठी १६ हजार सुरक्षा जवान तैनात

203

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : जिल्ह्रात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली, अहेरी व आरमोरी विधानसभा मतदार संघाकरिता बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली पोलिस दल सज्ज झाले असून तब्ब १६ हजार सुरक्षा जवान कर्तव्यावर तैनात आहेत. विशेष म्हणजे १७० शरणागत माओवादीदेखिल आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

विधानसभा मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने पूर्ण तयारी केली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल/ राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या (सी.ए.पी.एफ/एस.ए.पी.एफ) १११ कंपनी तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक व पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणांहून एकूण ५०० पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक ७०० च्या वर गृह रक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकुण १६ हजारच्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्ंरावर तैनात करण्यात आला आहे. निवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणूकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील ३६७ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले असून सी-६०/ सीआरपीएफ – क्यु.ए.टी./ वि.कृ.द./ क्यु.आर.टी पथकाच्या ३६ तुकड्यांमार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशील जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आकाशमार्गानेदेखिल सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक १३० ड्रोनसह सुसज्ज ड्रोन टीमही जमिनीवरील सैंन्यांसाठी आकाशात डोळा म्हणून काम करेल. तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी ५ अँटी ड्रोन गनदेखिल सज्ज राहतील. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मार्गावर डी.एस.एम.डी./व्हेईकल माऊंटेड डी.एस.एम.डी चा उपयोग करून सुमारे ७५० कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे ३ – एम.आय. १७ व भारतीय लष्कराचे २ – ए.एल.एच असे एकूण ५ हेलिकॉप्टर हे गडचिरोली पोलिस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलीस दलाच्या २ हेलिकॉप्टरसह एकूण ७ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी मतदान कर्मचा­री पाठविण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात व तेलंगणा आणि छत्तीसगडच्या लगतच्या जिल्ह्याच्या मदतीने निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.यासोबतच कालपासून भारतीय वायुसेनेच्या एम.आय १७ हेलिकॉप्टरच्या मदतीने १५३ मतदान केंद्रावरील ६५० मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर पाठविण्यात आले असून मंगळवार (ता. १९)पर्यंत उर्वरीत ५८ मतदान केंद्रांवर ईव्हीएम व मतदान कर्मचा­ऱ्यांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. निवडणूक काळात पोलिस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता बंदोबस्तात तैनातीस असल्याने त्यांना स्वत:चे मतदान करता येत नव्हते. त्यामुळे टपाली मतदानाद्वारे गडचिरोली पोलिसांमार्फत एकूण २९७९ टपाली मतदान करण्यात आले आहे. यासोबतच १७० शरणागत माओवादी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, विविध राज्यांतील पोलिस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलिस दल, गृह रक्षक दल हे अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) सुनिल रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक (माओवादविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहेत. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.