विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध ठिकाणी कारवाई

86

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : विधानसभा निवडणूकीदरम्यान विविध ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार (ता. १८) झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी दैने म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत आरमोरी, गडचिरोली, अहेरी असे एकूण ३ विधानसभा क्षेत्र आहेत. या विधानसभा क्षेत्राअंतर्गत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रचारसभा, रॅली आदीकरिता परवानगी होती. त्यानंतर कोणतीही जाहीर प्रचारसभा, रॅली घेता येणार नाही. बुधवार (ता. २०) मतदानाचा दिवस आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४अंतर्गत आरमोरी, गडचिरोली, अहेरी अशा एकूण ३ विधानसभा क्षेत्रांत आदर्श आचार सहिंतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करत असताना अवैध दारू, रक्कम बाळगणे, मतदारांना वस्तुच्या स्वरुपात प्रलोभनीय साहीत्य वाटप करणे आदी गैरप्रकारांबाबत कारवाई करण्यात आली. आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत स्थिर व फिरते निगरानी पथकाकडून अंदाजे २१९. २३ लिटर दारू, अंदाजित रक्कम १ लाख ४३ हजार २८९ व इतर साहीत्य (वाहन व इतर) अंदाजित रक्कम १ लाख ४५ हजार असा एकूण २ लाख ८८ हजार २८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या एकूण ५ प्रकरणांत ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्राअंतर्गत स्थिर व फिरते निगरानी पथकाकडून अंदाजे १३१. ०८ लिटर दारू, अंदाजित रक्कम ७३ हजार ३३५ व इतर साहित्य (वाहन व इतर) अंदाजित रक्कम ३ लाख ५० हजार १० रुपये असा एकूण ४ लाख २३ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या एकूण १० प्रकरणांत १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत स्थिर व फिरते निगरानी पथकाकडून नगद रोख रक्कम ७ लाख ५० हजार व अंदाजे ३९९. ८४ लिटर दारू, अंदाजित रक्कम १ लाख ६२ हजार ७४० व इतर साहीत्य (वाहन, लाकडी डोंगा, घड्याळ व साड्या आदी) अंदाजित रक्कम ५ लाख २ हजार ४०० असा एकूण १४ लाख १५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या एकूण १३ प्रकरणांत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तिनही विधानसभा क्षेत्राअंतर्गत नगद रोख रक्कम ७ लाख ५० हजार व अंदाजे ७५०. १५ लिटर दारू अंदाजीत रक्कम ३ लाख ७९ हजार ३६४ तसेच इतर साहीत्य अंदाजित रक्कम ९ लाख ९७ हजार ४१० असा एकूण २१ लाख २६ हजार ७७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण २८ प्रकरणांत २६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थिर व फिरते निगराणी पथकाकडून अंदाजे २१ लाख २६ हजार ७७४ व इतर विविध शासकीय विभागांकडून (पोलिस व अबकारी विभाग) अंदाजित रक्कम १ कोटी ५१ लाख ३० हजार ६१५ ( दारु व इतर साहित्य ) जप्त करण्यात आले. एकूण ४८७ प्रकरणांत ४११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूकविषयक कामाच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विधानसभा निर्वाचन क्षेत्र अहेरीमध्ये ५ व गडचिरोलीमध्ये १ असे एकूण ६ कर्मचाऱ्यांवर निवडणूक विषयक कामांत गैरहजर व गैरवर्तणूकीच्या अनुषंगाने ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.