पाच महिन्यापूर्वी आपला बेपत्ता झालेला मुलाचं सांगाडा तर नाही,अशी शंका त्या मातेला येत आहे.
ग्लोबल गडचिरोली न्यूज
कोरची : कोरची तालुक्यातील आंबेखारी या अतिदुर्गम भाग असलेल्या जंगलात अर्धवट जमिनीत गाडलेला मानवी सांगाडा सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्याची हत्या करून पुरावा लपवण्यासाठी तर जमिनीत गाडून ठेवले नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.
आंबेखारी गावातील दुलमाबाई कडयामी ही महिला नेहमीप्रमाणे झाडू बनवण्यासाठी सिंधीची पाने तोडायला जंगलात गेली होती. तिला तो अर्धवट जमिनीबाहेर आलेला सांगाडा दिसला. तिने गावात येऊन लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
विशेष म्हणजे ज्या महिलेला सर्वप्रथम हा सांगाडा दिसला, त्याच महिलेचा मुलगा वय,22 वर्ष पाच महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता.तो आपल्या मित्रासोबत जंगलात गेला असताना परतलाच नाही. त्यामुळे तो सांगाडा आपल्या मुलाचा तर नाही,अशी शंका त्या मातेला येत आहे.
तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्यासह कोरचीचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा.श्रेया बुद्धे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि डीएनए तपासणीसाठी सांगाड्यातील नमुना घेतला. या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान कोरची पोलिसांपुढे आले आहे.