चार बालके नदीत गेली, एकाचा बुडून मृत्यू, तिघे सुदैवाने वाचले

125

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : शहरापासून जवळ असलेल्या बोरमाळा घाटातील वैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून यातील तिघे मात्र सुदैवाने बचावले आहेत. ही घटना शनिवार (ता. ३०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातून नेला.

जौन अझहर शेख (वय १०) रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली असे मृत मुलाचे नाव आहे. रियाज शब्बीर शेख (वय १४), जिशान फय्याज शेख (वय १५), लड्डू फय्याज शेख (वय १३) सर्व रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली हे या घटनेत बचावले आहेत. हे सर्व जण शनिवारी दुपारी शहराजवळील बोरमाळा नदीघाटावर फिरण्यासाठी गेले होते. सोबत जिशान व लड्डू यांची आई ताजू शेख या देखील सोबत होत्या. वैनंगगा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे. पण पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मौजमजा म्हणून उतरलेली चारही मुले एकापाठोपाठ एक बुडाली. दरम्यान, यातील जौन शेख यास जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. इतर तिघे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारास आल्याची नोंद नाही. या घटनेनंतर हनुमान वॉर्डातील तेली गल्लीत मोठी गर्दी झाली होती. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.चारही मुले बुडाल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. नदीकाठावर असलेल्या ताजू फय्याज शेख यांनी धावत जाऊन पाण्यात उडी घेतली. हिंमत दाखवत त्यांनी एकटीने जिशान, लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज यास बाहेर काढले, पण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेल्या जौन शेख यास वाचविण्यात त्यांना यश आले नाही. यावेळी मदतीसाठी काही मासेमार धावले. त्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. इतर तीन मुले सुखरूप वाचली. दरम्यान जौन शेखच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती कळवून शवविच्छेदन करण्याची तयारी केली. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. २० ते २५ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून सुरक्षारक्षक, परिचारिकांशी हुज्जत घातली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो दुचाकीवरुन नेला, अशी माहिती मिळाली आहे.

——————————–