न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाने का झाडल्या स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या?

123

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. : येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्त्र पोलिस पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या एके-४७ रायफलमधून तब्बल ८ गोळ्या सुटल्या. त्यातील काही गोळ्या याच पोलिस कर्मचाऱ्याला लागल्या, तर काही गोळ्या तो बसलेल्या वाहनाच्या टपातून बाहेर वर गेल्या. मात्र पोलिस अंमलदार असलेल्या न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाने स्वत:वरच बंदुकीच्या गोळ्या का झाडल्या की, त्यांच्याकडून अनवधानाने ट्रिगर दबला, याबद्दल तर्कवितर्कांना उत आला आहे.

ही घटना बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिस कर्मचारी उमाजी होळी (ववय ४२ ) यांना ३ ते ४ गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत रुजू झालेले जिल्हा सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनासोबत सशस्र पोलिस कर्मचाऱ्यांचे एक वाहन नेहमीसाठी तैनात असते. दुपारी लंच ब्रेकनंतर न्यायमूर्ती कुळकर्णी यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून जिल्हा न्यायालयात सोडल्यानंतर सुरक्षा रक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारात पार्क करण्यात आले होते. चालकासह तीन सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरले, पण उमाजी होळी हे गाडीतच बसून होते. थोड्याच वेळात गाडीतून धडाधड गोळ्या सुटल्याचा आवाज आला. सुरुवातीला ३ गोळ्यांचे आवाज आले. त्यानंतर पुन्हा काही गोळ्यांचे आवाज आले. प्रत्यक्षात होळी यांच्या बंदुकीतून ८ गोळ्या सुटल्या होत्या. गोळ्या सुटत असताना गाडीजवळ जाणे धोक्याचे असल्याने खाली उतरलेले सुरक्षा रक्षक जवळ गेले नाहीत. पण आवाज थांबल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी तीन गोळ्या लागलेल्या अवस्थेत मधल्या सीटवर बसलेले उमाजी होळी यांनी स्वतःच गाडीचे दार उघडले. त्याचवेळी बाहेर असलेल्या सोबतच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून रुग्णालयाकडे धाव घेतली. पण अतिरक्तस्राव झाल्याने काही वेळातच होळी यांचा मृत्यू झाला. एके-४७ रायफलमधून सुटलेल्या गोळ्यांपैकी पाच गोळ्या गाडीच्या टपातून बाहेर आल्या, तर तीन गोळ्या बाजुच्या व मागील बाजुने बाहेर निघाल्या. त्यामुळे या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिस विभागाने उमाजी होळी यांच्याकडून अनावधानाने ट्रिगर दबल्याचे स्पष्ट केले आहे. उमाजी होळी यांच्या हातून अनावधानाने त्यांच्याच बंदुकीचा ट्रिगर दबला व तो तसाच दबून राहिला. त्यामुळे आठ गोळ्या झाडल्या गेल्या. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. अनावधानाने ही घटना घडली, असे गडचिरोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी म्हटले आहे.

————————————–