प्रत्येक सोमवार, गुरुवारी भरवणार जनता दरबार : डाॅ. देवराव होळी

111

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : मागील दहा वर्षे जनतेने मला भरभरून मतरूपी आशीर्वाद देत आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. जनतेच्या आशीर्वादानेच या विधानसभा क्षेत्राचा विकास करता आला. आता आमदार नसलो तरी जनतेच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहणार आहे. दर सोमवार व गुरुवारी जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडविणार असल्याची घोषणा माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी केली.

मंगळवार १० डिसेंबर रोजी डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. देवराव होळी व बिनाराणी होळी यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वय किसन नागदेवे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, रामायण खटी, रमेश भुरसे, मिलिंद घरोटे, गुरुदेव सेवा मंडळाचे केशवराव दशमुखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, अनंत साळवे, बबलू हुसैनी, माजी पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, संजय निखारे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डाॅ. देवराव होळी यांनी दहा वर्षांत झपाट्याने केलेल्या विकासकार्यांचे विवेचन करत त्यांच्यासारखा लोकप्रतिनिधी जनतेला कायमच हवा असतो, अशा भावना व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या व दीर्घायुष्य, उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. संचालन आभार विलास दशमुखे यांनी मानले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्रपरिवार व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यात रक्त्तदान शिबिर, अन्नदान, मनोरुग्णांना ब्लॅंकेट, रुग्णालयात फळ वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

———————————–