घरातून भांडून बेपत्ता झालेल्या महिलेला अखेर भामरागड पोलिसांनी शोधलेच

125

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : घरगुती वादातून संतप्त होत घरातून बेपत्ता झालेल्या महिलेला तब्बल दीड वर्षांनंतर भामरागड पोलिसांनी शोधून काढले आणि कुटुंबाला सुपुर्द केले आहे.

भामरागड येथील रहिवासी संजय कालिपद सरदार यांची पत्नी सुप्रिया सरदार ही घरगुती भांडणाच्या रागातून त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींसह १५ जून २०२३ रोजी भामरागड येथील घरातून निघून गेली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने भामरागड पोलिस ठाण्यात दिली होती. अखेर दीड वर्षानंतर या महिलेला पोलिसांनी शोधून काढले. या बेपत्ता प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री सगणे करत होत्या. बेपत्ता महिला मोबाईल वापरत नसल्याने तिच्या ठावठिकाण्याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेने तिच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्याबाबत माहिती मिळताच ते अकाउंट कोणाचे आहे याबाबत पोलिसांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु फार माहिती मिळा नाही. सोशल मीडियावरील त्या फोटोमध्ये मुलीने परीधान केलेल्या गणवेशावर शाळेचा सिम्बॉल अस्पष्ट दिसत होता. पोलिसांनी त्या सिम्बॉलशी समरूप असलेल्या सुमारे ३५ ते ४० शाळांची माहिती इंटरनेटवरून काढून त्या प्रत्येक शाळेमध्ये चौकशी केली. चौकशी केलेल्या त्या शाळांपैकी एका शाळेचा गणवेश असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित संस्था चालकाने सुरुवातीला माहिती देण्यास नकार दिला. परंतु त्याला योग्य भाषेत समज देताच त्याने आवश्यक ती सर्व माहिती चौकशी अधिकाऱ्यांना दिली. तसेच पोलिस ठाण्यात दाखल मिसिंगची माहिती बेपत्ता महिलेस दिली. तरी देखील बेपत्ता महिलेने भामरागड येथे परत येण्यास नकार दिला. परंतु पोलिसांनी तिचे समुपदेशन केले व तिला विश्वासात घेतल्याने शुक्रवार (ता. २७) आपल्या मुलीसह भामरागड येथे परतली. आवश्यक ते सोपस्कार पार पाडून पोलिसांनी महिलेस तिच्या घरी सुखरूप ताब्यात दिले. तसेच अन्य एक मिसिंग केसमध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्व तपास करून बेपत्ता महिलेला मुक्ताईनगर, जळगाव येथून महिला पोलिस हवालदार माधुरी वेलादी व पोलिस हवालदार रमेश विलादी यांनी ताब्यात घेऊन सुखरूपपणे नातेवाईकाच्या ताब्यात दिले. ही उल्लेखनीय कामगिरी भामरागड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोम यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री सगणे, महिला पोलिस हवालदार माधुरी वेलादी, पोलिस हवालदार रमेश वेलादी व पोलिस अंमलदार शैलेश टोकला यांनी केली.

————————————