पेनगुंडा परीसरातील माओवाद्यांचे स्मारक गडचिरोली पोलिस दलाने केले उद्ध्वस्त

120

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

  • गडचिरोली, ता. २८ : नुकत्याच स्थापन झालेल्या अतिदुर्गम पेनगुंडा येथील पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत असलेले माओवाद्यांचे स्मारक गडचिरोली पोलिस दलाने शनिवार (ता. २८) उद्ध्वस्त केले.
  • माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आजदेखील विकासापासून दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने ११ डिसेंबर २०२४ रोजी भामरागड उपविभागाअंतर्गत पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. शनिवारी पेनगुंडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पेनगुंडा ते नेलगुंडा रस्त्यावर पेनगुंडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलिस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्यांचे स्मारक बांधलेले आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. वरीष्ठांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस दलाच्या बीडीडीएस, प्राणहिता व विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकांतील जवानांनी या परिसरात शोध अभियान सुरू केले. पेनगुंडा ते नेलगुंडा रस्त्यावर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. बीडीडीएस पथकाने या परिसराची कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी माओवाद्यांनी बांधलेले हे स्मारक उद्ध्वस्त केले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले आहे. माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही व त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

———————————