Home Gadchiroli विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी जीडीसीसीची स्वप्नसंचय योजना प्रारंभ

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी जीडीसीसीची स्वप्नसंचय योजना प्रारंभ

110

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली १७ : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागणे व त्यांना उच्च शिक्षणाकरिता कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी व उच्च शिक्षण संपल्यानंतर लहान-मोठे लघुउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते हा दृष्टीकोन ठेवून बँकेने विद्यार्थ्यांकरिता स्वप्नसंचय योजना सुरू केली. या योजनेचा प्रारंभ गुरुवार (ता. १६) बँकेच्या मुख्य कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार होते. तसेच गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विद्यार्थ्यांकरिता नावीन्यपूर्ण सुरू केलेल्या स्वप्नसंचय योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद भुयार यांनी केले. या कार्यक्रमात मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास कावळे म्हणाले की, बँकेने विद्यार्थ्यांना लहान वयापासून बचतीची सवय लावण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षणाकरिता कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले की, या योजनेमुळे विद्यार्थ्यांना बचतीच्या सवयीसोबतच बँकेकडून त्यांच्या उच्च शिक्षणाकरिता व इतर कारणांकरिता कोणतेही तारण न घेता कर्ज सुविधा बँकेकडून उपलब्ध होणार आहे. त्यांना बँकेच्या प्रचलीत व्याजदरापेक्षा मुदत ठेवीवर जादा व्याज व सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा उपलब्ध होणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व बँक विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले. या कार्यक्रमात गडचिरोली शहर व परिसरातील जिल्हा परिषद, कॉन्व्हेंट व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्नसंचय योजनेचे बचत खाते उघडले अशा ७५ विद्यार्थ्यांना बचत किटचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. प्रास्तावीकात त्यांनी स्वप्नसंचय योजेनेचे उद्देश व त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे याची माहिती दिली. या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, संचालक डॉ. बलवंत लाकडे, संचालिका सुलोचना वाघरे, जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन बँकेचे सरव्यवस्थापक राजू सोरते यांनी केले, तर आभार किरण सांबरे यांनी मानले.

———————————-