अतिदुर्गम नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना

90

ग्लोबल गडचिरोली न्यूज 

गडचिरोली, ता. ३० : गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम नेलगुंडा येथे १००० सी–६० कमांडो, २५ बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक) टीम, नवनियुक्त पोलिस जवान, ५०० विशेष पोलिस अधिकारी व खासगी कंत्राटदार यांच्या मदतीने अवघ्या २४ तासात नवीन पोलिस स्टेशन उभारले.

विशेष पोलिस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, ११३ बटालियन सीआरपीएफचे कमांडण्ट जसवीर सिंग, ०९ बटालियनचे कमांडण्ट शंभु कुमार, ३७ बटालियनचे कमांडण्ट दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुरुवार (ता ३०) या नवीन पोलिस स्टेशनचे उद्घाटन पार पडले.

माओवादृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यंाचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी उपविभाग भामरागडअंतर्गत नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन २०२४ या वर्षाअखेर दिनांक ११डिसेंबर २०२४ रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. भामरागडपासून २०किमी., धोडराजपासुन १४किमी., पेनगुंडा पोलिस मदत केंद्रापासुन ४कि.मी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त ६००मीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम नेलगुंडा आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलिस स्टेशन नेलगुंडा मैलाचा दगड ठरेल.

या पोलिस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १०५० मनुष्यबळ, १० जेसीबी, १९ ट्रेलर, ०४पोकलेन, ४५ ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलिस स्टेशनची उभारणी करण्यात आली. या पोलिस स्टेशनमध्ये पोलिस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, १९ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ०८ सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलिस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे ४अधिकारी व ४९ अंमलदार, एसआरपीएफ ग्र

सोलापूरचे१० प्लाटुन तसेच सिआरपीएफ ११३बटालियन डी कंपनीचे १ असिस्टंट कमांडन्ट व ६९ अंमलदार, विशेष अभियान पथकाचे ६ पथक ( १५० कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिस स्टेशन उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलिस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नऊवारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलिस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले. या नवीन पोलिस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलिस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलिस बल, गडचिरोली अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, कमांडण्ट ११३बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल जसवीर सिंग, कमांडण्ट ९ बटालियन केंद्रीय राखीव पोलिस बल शंभु कुमार, कमांडण्ट ३७ बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी, भामरागड अमर मोहिते व पोलिस स्टेशन नेलगुंडा 

चे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अमोल सोळुंके, इतर अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.

—————————–