शुभ संदेश देणारी वसंत पंचमी

107

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

बसंत पंचमी ही हिंदू पंचागानुसार वसंत ऋतूच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या म्हणजे पंचम तिथीला असते. याच दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला म्हणून या दिवशी माता सरस्वतीचीही पूजा केली जाते. संपूर्ण देशामध्ये या दिवशी वसंत पंचमी साजरी करताना विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा मोठ्या उत्साहाने केली जाते. बंगालमध्ये माता सरस्वतीची पूजा प्रत्येक शाळेत केली जाते. शाळेत सरस्वतीची मूर्ती तयार करून मोठ्या उत्साहाने मुले पूजेची तयारी करतात, या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते, सरस्वती मातेलासुद्धा पिवळ्या रंगाच्या प्रसादाचा नैवैद्य दाखवला जातो. या दिवशी विद्यार्थी मुले पैजामा, कुर्ता परिधान करतात आणि विद्यार्थिनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करतात. सर्व विद्यार्थी पूजा पूर्ण होईपर्यंत उपवास ठेवतात. पूजा संपल्यानंतर मातेला नैवेद्य देऊन प्रसाद घेऊन उपवास सोडतात. सरस्वती पूजेचा प्रसाद सेवन करणे अतिशय शुभ मानले जाते.बंगालमधे सरस्वती मातेच्या पूजेला महत्त्व आहेच. पण या दिवशी आणखी एक खास परंपरा पाळली जाते. जे बालक अद्याप शाळेत जायचे आहे किंवा जाणार आहेत त्यांना पुजेनंतर पुजाऱ्याकडे नेऊन त्याच्याकडून पहिली आद्याक्षरे हाथखड़ी गिरवली जाते. पुजारी त्या बालकाच्या हातात खडू देऊन त्याचा हात धरून पाठीवर अक्षरे उमटवत्त त्याच्या विद्येच्या प्रवासाचा प्रारंभ करतात. पूजेला पळसाचे फुल आणि बोर असते. बोराने मुलांचे बुद्धीवर्धन होते, अशी मान्यता आहे. वसंत पंचमी ही वसंत ऋतूत येते. निसर्गातील मनभावन वसंत ऋतूत प्रेमाचे प्रतीक आहे. वसंत ऋतूमध्येच सर्व वृक्षवेलींना नवीन पानं, फुलं येतात.आम्रवृक्षाला बहर येतो. वातावरण अगदी प्रफुल्लित असते. एरवी व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा होत असला, तरी आपले प्रेम व्यक्त करण्याचा खास ऋतू भारतात वसंत ऋतुच मानला जातो. याच काळात वसंत पंचमीला युवक-युवती आपलं प्रेम व्यक्त करतात. त्यामुळे वसंत पंचमी आनंद, उत्साह, निसर्गातील व मानवी जीवनातील नवचैतन्य आणि शुभ संदेश देणारं पर्व आहे.

 

तिलोत्तमा हाजरा

एडीटर इन चिफ

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,