ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २० : उपविभाग भामरागडमधील कोठी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पोयारकोठी येथील ग्रामस्थांसाठी पोलिस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन गुरुवार (ता. २०) सर्वानूमते माओवाद्यांना गावबंदी करून त्याबाबतचा ठराव कोठी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सादर केला आहे
माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. सन २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास वृद्धींगत झाला आहे आणि माओवादाचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील पेनगुंडासह एकुण २० गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. यामुळे शासनाप्रती गडचिरोली येथील जनतेचा असलेला विश्वास अधोरेखीत झाला आहे.
गुरुवारी उपविभाग भामरागडमधील कोठी पोलिस स्टेशनअंतर्गत पोयारकोठी येथील ग्रामस्थांसाठी पोलिस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानूमते माओवाद्यांना गावबंदी करून त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी यांना सादर केला आहे, यावेळी गावातील ७० ते ७५ नागरिक उपस्थित होते. यासोबतच गावातील नागरिकांनी २ भरमार बंदूकादेखील पोलिस स्टेशन येथे सुपूर्द करून माओवाद्यांच्या विरोधातील लढाईमध्ये आपण पोलिस दलाच्या बाजूने उभे आहोत, असे आश्वासन दिले आहे. तसेच या महिन्यातच ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कोठी पोलिस स्टेशन येथे ग्रामस्थांसाठी घेण्यात आलेल्या जनसंपर्क बैठकीदरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीदरम्यानच मरकनार येथील नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानुमते माओवाद्यांना गावबंदी करून त्याबाबतचा ठराव कोठी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सादर केला होता. या बैठकीदरम्यान मरकनार येथील ५५ ते ६० नागरिक उपस्थित होते. ही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परीसराच्या अगदी जवळ असल्याने भूतकाळामध्ये या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. या बैठकी दरम्यान कोठीचे प्रभारी अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन गडचिरोली पोलिस दल ठामपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आणि शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचे महत्त्व पटवुन दिले. यासोबतच माओवाद्यांची भीती न बाळगता त्यांच्या दमदाटीस न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून माओवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करण्याविषयी विश्वास पटवून दिला. गावकऱ्यांनीदेखील यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवण/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक आणि युवक माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, गावातील जंगल परिसरात माओवाद्यांना थांबू देणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही, असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले. यासाठी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, कोठी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या नक्षल गावबंदी ठराव करणाऱ्या गावातील नागरिकांचे विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी अभिनंदन केले असून अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता गडचिरोली जिल्ह्रास माओवादमुक्त जिल्हा करण्यात प्रशासनाची अशाच प्रकारची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.










