केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाची स्वत: वरच गोळी झाडून आत्महत्या

101

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. २४ : धानोरा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने सोमवार(ता. २४) सकाळी स्वत: वरच गोळी झाडून जीवन संपवले. गिरीराज रामनरेश किशोर (वय ३०) असे मृत जवानाचे नाव आहे.

धानोरा येथील पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिसांसह केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियनचे जवान कार्यरत आहेत. गिरीराज किशोर हा आग्रा येथील मूळ निवासी असून ऑक्टोबर २०२४ मध्ये तो धानोरा पोलिस ठाण्यात बटालियनमध्ये रुजू झाला. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्याला पुणे येथे तात्पुरत्या स्वरूपात पाठविण्यात आले. रविवारी संध्याकाळी तो धानोरा पोलिस ठाण्यात परतला.गिरीराज किशोर हा सोमवारी सेंट्री म्हणून कर्तव्यावर होता. मात्र, सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःकडील रायफलमधून आपल्याच कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या केली की चुकून गोळी लागली, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेमुळे कुटुंबापासून दूर राहून सेवा देणाऱ्या जवानांच्या मानसिक तणावाचा विषय पुन्हा एकदा चर्चेच आला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी तैनात राज्य राखीव दलाच्या जवानाने गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली होती. त्यानंतर ११ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकानेही गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली होती. अहेरी उपविभागातसुद्धा यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत.