ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २६ : गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या
(GDPL) उत्कंठावर्धक उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) सामन्यांनंतर आता उपांत्य (सेमी फायनल) फेरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही अंतिम विजयाची चुरशीची लढत अत्यंत रोमांचक ठरणार आहे.
या स्पर्धेत सेमी फायनल सामना गडचिरोली हरिकेन्स विरूद्ध अहेरी सुपर किंग्स व गडचिरोली पोलिस कमांडो वॉरियर्स विरूद्ध चामोर्शी ईगल्स या संघांमध्ये होणार आहे. या दोन सामन्यांमधून अंतिम फेरीसाठी दोन संघ निश्चित होतील. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानासाठी विशेष सामना उपांत्य फेरीतील पराभूत संघांमध्ये रंगणार आहे. विशेष म्हणजे या भव्य स्पर्धेत महिला क्रिकेटर्सचा प्रदर्शनीय सामना हे खास आकर्षण राहणार आहे. हा सामना महिलांच्या खेळातील कौशल्याला प्रोत्साहन देणारा ठरेल. GDPL च्या पहिल्याच मोसमात क्रिकेट चाहत्यांना अप्रतिम सामने पाहायला मिळाले असून सेमी फायनल आणि अंतिम फेरीत उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात क्रिकेटच्या नव्या पर्वाचा साक्षीदार होण्याची ही अनोखी संधी असून क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने या रंजक आणि रोमांचक सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. GDPL चा पहिला चॅम्पियन कोण होणार? याचे उत्तरसुद्धा लवकरच मिळणार आहे.










