दोन जहाल माओवाद्यांचे सीआरपीएफ, पोलिसांपुढे आत्मसमर्पण

94

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २७ : येथील गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखिव पोलिस दलापुढे दोन जहाल माओवाद्यांनी गुरुवार (ता. २७)आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांमध्ये डी. व्हि.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यासह १ सदस्य असे एकूण २ जहाल माओवादी असून कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालू पल्लो, (डी.व्हि.सी.एम सप्लाय टीम), (वय ५६), रा. गुडंजुर (रिट), ता. भामरागड, जि. गडचिरोली व सुरेश ऊर्फ वारलू ईरपा मज्जी (दलम सदस्य, भामरागड दलम),( वय ३०), रा. मिळदापल्ली ता. भामरागड, जि. गडचिरोली, अशी त्यांची नावे आहेत.

कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो सन १९९३ मध्ये मद्देड दलममध्ये भरती होवून १९९५ पर्यंत काम केले. सन १९९५ ते १९९८ पर्यंत उत्तर गडचिरोलीतील प्लाटुन क्र. ०२ मध्ये सदस्य पदावर काम केले. सन १९९८ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन २००१ पर्यंत सदस्य पदावर काम केले. सन २००१ मध्ये उप-कमांडर पदावर पदोन्नती होऊन पेरमिली दलममध्ये सन २००३ पर्यंत काम केले. सन २००३ मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन २००६ पर्यंत उप-कमांडर पदावर काम केले. सन २००६ मध्ये एसीएम (Area Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये २००८ पर्यंत काम केले. सन २००८ मध्ये डिव्हीसीएम (Divisional Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड, चातगाव व कसनसूर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये २०१५ पर्यंत काम केले. सन २०१५ मध्ये माड एरीयामध्ये स्टाफ सप्लाय टिममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपर्यांत काम केले. तिच्यावर आजपर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ७ चकमक, १ जाळपोळ व ३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याने सन २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२४ पर्यंत काम केले. सप्टेंबर २०२४ मध्ये डिव्हीसीएम राजू वेलादी ऊर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून आजपर्यंत काम केले. त्याच्यावर १ चकमकीचा गुन्हा दाखल असून इतर गुन्ह्यांत त्याच्या सहभागाची पडताळणी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालू पल्लो हिच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिला एकूण ८.५ लाख रुपये व सुरेश ऊर्फ वारलू ईरपा मज्जी याला एकूण ४.५ लाख रुपये देण्यात येतील. गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सन २०२२ ते आतापर्यंत एकूण ५५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन २०२५ साली आतापर्यंत एकूण २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या यशासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सिआरपीएफचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनात पार पाडली.