गडचिरोली पोलिस दलाने पटकावला ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग’ पुरस्कार

131

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता.४ : गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडान या उपक्रमाची दखल घेऊन नुकताच भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) च्या वतीने देण्यात येणारा फिक्की स्मार्ट पोलिसींग पुरस्कार २०२४ हा पुरस्कार गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडानला घोषीत करण्यात आला आहे. फिक्कीतर्फे नवी दिल्ली येथील फिक्की फेडरेशन हाऊस येथे आयोजित सोहळ्यात गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मंगळवार ४ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार स्वीकराला.

या पुरस्कार सोहळ्यात माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई आणि डीजीपी आरपीएफ अरुण कुमार यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये “community policing ” या श्रेणीतून गडचिरोली पोलिस दलाची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम माओवादग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने ३ मार्च २०२३ रोजी “प्रोजेक्ट उडान” हा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी या सर्व आयामांचा विचार करून प्रोजेक्ट उडानची आखणी करण्यात आली आहे. प्रोजेक्ट उडानअंतर्गत शिक्षणाकरिता एक गाव एक वाचनालय, समर,-विंटर कॅम्प, स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम, ऑपरेशन रोशनी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र अशा बहुआयामी कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. एक गाव एक वाचनालय उपक्रमाअंतर्गत अतिदुर्गत भागातील गावांमध्ये आतापर्यंत सर्व सोयींनी सुसज्ज अशा एकुण ६८ वाचनालयांची निर्मिती करण्यात आली असून दुर्गम भागातील युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत एकूण ११२ आश्रमशाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षांकडे कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध पर्यटन स्थळे, संग्रहालये, विविध संस्कृती यांचे ज्ञान उपलब्ध व्हावे याकरिता आतापर्यंत एकुण ५ समर-विंटर कॅम्पमध्ये ४०८ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास उपयुक्त असे प्रशिक्षण देण्याकरिता व त्यांची सामाजिक जाणीव प्रगल्भ होण्याकरिता इयत्ता ८ वी व ९ वी मधील ३०० विद्यार्थ्यांकरिता ५ दिवसीय निवासी स्टुडंट पोलिस कॅडेट शिबिराचा अभिनव प्रयोग महाराष्ट्रात प्रथमत:च गडचिरोली पोलिस दलाकडून करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू युवक-युवतींच्या हाताला काम मिळावे व त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, याकरिता विविध संस्थांच्या सहकार्यांने गडचिरोली पोलिस दलाकडून युवक-युवतींकरिता विविध रोजगार प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये फास्टफुड, ब्युटीपार्लर, शिवणकाम, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, टू-व्हिलर मेकॅनिक, फोर व्हिलर मेकॅनिक, टिव्ही ऑपरेटर आधी प्रशिक्षणांचा समावेश आहे. या विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण १२८६४ युवक-युवतींना रोजगार- स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली पोलिस दलाच्या नाविन्यपूर्ण अशा स्किलींग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून सुशिक्षित युवक-युवतींकरिता सॉफ्टवेअर डेव्हलपर, मिडीया डेव्हलपर, वेब डिझायनर, 

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. स्किलींग इन्स्टिट्युटद्वारे एकूण ४४० युवक-युवतींना संगणकाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलुस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या २०५ युवकांची निवड राज्यातील विविध पोलिस दलांमध्ये झालेली आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. यादृष्टीने गडचिरोली पोलिस दलाकडून पोलिस स्टेशन व उपविभाग स्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन केले जाते. याच मेळाव्यांदरम्यान ऑपरेशन रोशनी अंतर्गत ६ हजारांहून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून १२०० नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासोबतच १६३० दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप व ८२० दिव्यांग नागरिकांना कृत्रीम साहित्य (हात-पाय) वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतक­री बांधवांनी आपल्या शेतीमध्ये विविध आधुनिक प्रयोग करावे व त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे, यासाठी आतापर्यंत १६ कृषी सहली राज्यातील विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे येथे पाठविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करता, पोलिस दलास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.