पोलिसांनी जप्त केला ७ लाखांचा मुद्देला, दोघांना अटक

264

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ७ : जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये पोलिसांनी चामोर्शी तालुक्यात कारवाई करत गुरुवार (ता. ६) तब्बल ४ लाखांची अवैध दारू, दारूतस्करीसाठी वारलेले ३ लाखांचे वाहन असा एकूण ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन आरोपींनाही ताब्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार गोलू मंडल, रा. कुनघाडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हा अवैधरित्या आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून चामोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले. हे पथक रात्री २ वाजताच्या दरम्यान चामोर्शीच्या पश्चिमेस २ किमी अंतरावर सापळा लावून बसले होते.

एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिस पथकाने वाहनाची जवळून तपासणी केली.वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या ५० पेटी (बॉक्स) किंमत अंदाजे ४ लाख रुपये आढळली.

अवैध दारूसह एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीचे विटारा ब्रिझा वाहन क्र. एम. एच. ४९ बी.बी.२५६७ किंमत अंदाजे ३ लाख रुपये असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर चामोर्शी पोलिस स्टेशन येथे गोलू मंडल ( वय ३२) रा. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली, गणेश नरेंद्र नैताम ( वय २२), व्यवसाय वाहन चालक, नीरज किरण भुर्रे( वय १८), दोघेही रा. गोकुलनगर, ता. जि. गडचिरोली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश नैताम, नीरज भुर्रे यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी गोलू मंडलचा शोध घेणे सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे आणि चालक पोलिस अंमलदार माणिक निसार यांनी पार पाडली.