ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ८ : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात महिलादिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी निरनिराळ्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या नारी शक्तींचाही सत्कार व गौरव करण्यात आला.

भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी हिरीरीने सहभाग घेऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली नरोटे, अर्चना नेते, यशोधरा उसेंडी तसेच डॉ .चंदा कोडवते उपस्थित होत्या. यावेळी विशेष म्हणजे जिल्ह्यातून विविध मंडळातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या गडचिरोलीच्या निवृत्त परिचारिका शालिनी निंबार्ते तसेच गोंडवाना विद्यापीठातून पत्रकारितेचे रितसर शिक्षण पूर्ण करून ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल यशस्वीपणे चालवत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या महिला पत्रकार व नुकत्याच व्हॉईस ऑफ मिडिया महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या तिलोत्तमा हाजरा, पती निधनानंतर एलआयसीमध्ये विशेष ओळख निर्माण करणाऱ्या, घराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या सुनीता आलेवार अशा कर्तृत्वान महिलांचा भाजप महिला मोर्चातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महिलांनी आजच्या काळात कुठेही मागे न राहता समोर येऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवावे, महिलांनी आजच्या घडीला कमजोर न बनता प्रत्येक समस्येला धैर्याने तोंड द्यावे. आज सर्वत्र जगभर महिलादिन साजरा होत आहे. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे . शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तसेच शिक्षिका, डॉक्टर ,पोलीस, पोलिस, तलाठी, ग्रामसेविका,पायलट ,खेळाडू अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या भारत देशामधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. त्यामुळेच कुणाच्या आधाराची वाट न बघता महिलांनी समोर येऊन स्वतःला सिद्ध करायला हवे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी केले.
अर्चना नेते महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून हा वारसा चालवला. यशोधरा उसेंडी म्हणाल्या की, माँ जिजाऊंनी लहानपापासून जसे संस्कार करून शिवबाला घडविले की आज आपण त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाने मुलींसोबत मुलांवरदेखील लहानपणापासून घरातून चांगले संस्कार दिले तर आज समाजात घडण्याऱ्या अनुचित घटनांचे प्रमाण कमी होईल. यावेळी वैशाली नरोटे, डॉ .चंदा कोडवते यांनीही महिलांना यथोचित मार्गदर्शन करून सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महिला मोर्चा जिल्हा महामंत्री रोशनी वरघंटे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री शालिनी पोहनेकर, कोरचीच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शीला सोनकोतरी, चामोर्शी महिला मोर्चा शहराध्यक्ष कविता किरमे, पद्मा सडमेक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अहेरी लक्ष्मीताई कलंत्री, पल्लवी बारापात्रे, अर्चना निंबोळ, अलका पोहनकर, रेखा उईके, मंदा मांडवगडे, अनिता विश्रोजवार, प्रतिभा चौधरी, कोमल बारसागाडे, भारती खोब्रागडे, अंजली देशमुख, संगीता राऊत, सगुणा काटेंगे, नीलकमल मोहुर्ले, भूषणा खेडेकर, शुभू शातलवार तसेच गडचिरोली शहरातील तसेच मंडळातील अन्य महिला पदाधिकारी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यावेळी उपस्थित होत्या. सर्व महिला पदाधिकाऱ्यांना महिलादिनानिमित्य महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी डोंगरे व प्रतिमा सोनवणे यांनी केले, तर आभार महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री रोशनी वरघंटे यांनी मानले.










