जागतिक महिलादिनानिमित्त अंतरंग योग केंद्रात मार्गदर्शन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १३ : आजच्या धकाधकीच्या युगात जीवन अतिशय धावपळीचे झाले असून महिलांना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपल्या आरोग्याच्या संवर्धनासाठी महिलांनी नियमित योगाभ्यास करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन श्री श्री रविशंकर गुरूजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या योग शिक्षिका अंजली कुळमेथे यांनी केले.
योग शिक्षक अनिल निकोडे यांच्या अंतरंग योग प्रशिक्षण केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी केंद्राचे संचालक तथा योग शिक्षक अनिल निकोडे उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना योग शिक्षिका अंजली कुळमेथे म्हणाल्या की, महिला घर, नोकरी सगळ्याचे उत्तम व्यवस्थापन करतात. पण यात त्यांची बरीच शारीरिक, मानसिक उर्जा वापरली जाते. अशा वेळी त्यांनी आपल्या आरोग्याचेही योग्य नियोजन करायला हवे. त्यासाठी योगविद्येसारखा दुसरा उत्तम उपाय नाही. म्हणून महिलांनी नियमित योग, प्राणायाम, ध्यानाचा अभ्यास करावा. आपले शरीर, मन मजबूत असेल तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो., असेही त्या म्हणाल्या. यावेळी योग शिक्षिका अंजली कुळमेथे यांनी महिलांना विविध प्रकारची आसने, प्राणायाम, ध्यानाच्या शास्त्रोक्त पद्धतींची सविस्तर माहिती दिली. तसेच आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने मोफत घेण्यात येत असलेल्या मासिक पाळीसंदर्भात इत्थंभूत माहिती, विविध आजार, उपचारांची माहिती असलेल्या प्रोजेक्ट पवित्रा या शिबिराबद्दलही सांगितले. गडचिरोली मधे एकमेव नियमित योगाभ्यास केंद्र सुरू करण्याबाबत,आणि अंतरंग योग प्रशिक्षण केंद्रात देण्यात येत असलेल्या योग प्रशिक्षण व उपक्रमांबद्दल त्यांनी योग शिक्षिक अनिल निकोडे यांचे कौतुक केले. योग शिक्षक अनिल निकोडे यांनी मानवी जीवनात योगविद्येचे अनन्यसाधारण महत्त्व असून रोज न चुकता योगाभ्यास करावा, असे आवाहन करत योग शिक्षिका अंजली कुळमेथे यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला योग प्रशिक्षण केंद्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.










