Home Gadchiroli आधारविश्व फाऊंडेशन” ने मूकबधिर मुलांसोबत साजरी केली रंगपंचमी

आधारविश्व फाऊंडेशन” ने मूकबधिर मुलांसोबत साजरी केली रंगपंचमी

199

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १६ : विविध सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेल्या आधारविश्व फाउंडेशन या महिलांच्या सामाजिक संघटनेने मुरखळा येथील निवासी मूकबधिर विद्यालयात मुलांसोबत रंगपंचमी साजरी करून त्यांना मायेचा ओलावा दिला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात १४ मार्च २०२५ रोजी मुरखळा येथील निवासी मूकबधिर विद्यालय येथे जाऊन विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली. कोणाचाही दोष नसताना काही मुले दिव्यांग म्हणून जन्म घेतात. शिक्षणासाठी ही मुले कुटुंबापासून दूर राहतात. शाळेतील काही मुले गावापासून बराच अंतरावर असल्यामुळे सणासुदीलासुद्धा घरी जाऊ शकत नाहीत. अशा मुलांना आपल्या आनंदातील थोडासा आनंद देता यावा यासाठी आधारविश्व फाउंडेशनच्या सदस्य दरवर्षी अशाच मुलांसोबत रंगपंचमीचा सण साजरा करतात. यावेळी निवासी मूकबधिर शाळेतील मुला- मुलींना पेन्सिल ,साखरगाठी,चॉकलेट, नाश्ता देण्यात आला. आधारविश्वच्या सदस्यांनी आईच्या वात्सल्याने गोड पदार्थ भरवून त्यांच्यासोबत पंगतीत बसून नाश्त्याचा आनंद घेतला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना गुलाल लावून रंगोत्सव साजरा केला. त्यानंतर सर्व सदस्यांनी त्या मुलांसोबत नाच, गाणी , रंग उधळून रंगपंचमीचा आनंद घेतला. कार्यक्रम आटोपल्यावर सर्व मुलंमुली आधारविश्व फाउंडेशनच्या सदस्यांची गळाभेट घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सर्व सदस्यांनी समाधानी अंतःकरणाने निरोप घेतला. या कार्यक्रमासाठी आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, सचिव सुनीता साळवे, सीमा कन्नमवार, दीप्ती वैद्य, मीनल हेमके, अंजली देशमुख, भारती खोब्रागडे, गायत्री गेडाम,अश्विनी शृंगारपवार, प्राची साळवे, साक्षी साळवे, सुशील हिंगे, विजय साळवे, सचिन हेमके, विनय साळवे आदींनी सहकार्य केले.