सोनू निगमच्या सुमधुर स्वरांनी सजली ‘लॉयड्स’ची संगीत मैफल

182

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. २१ : लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडतर्फे शहरातील कॉम्प्लेक्स येथील एमआयडीसीच्या मैदानावर गडचिरोली जिल्हा प्रीमीअर लिगचे आयोजन करण्यात आले होते. या लिगचा अंतिम सामना पार पडल्यानंतर रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध गायक तथा अभिनेते सोनू निगम यांचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. सोनू निगम यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेल्या या मैफलीचा मनमुराद आनंद गडचिरोलीकर रसिकांनी घेतला.

सोनू निगम यांनी आपल्या हिंदी गीतांच्या बहारदार सादरीकरणातून गडचिरोलीकरांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एमआयडीसी परिसरात एकच गर्दी केली होती. मुंबईचे हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना ऐकण्यासाठी चाहत्यांची अफाट गर्दी होती. नागरिकांच्या तुफान गर्दीने नियोजनाचा मात्र बोजवारा उडाला. तरीही सोनू निगमच्या उडत्या चालीच्या गीतांवर गडचिरोलीकर थिरकले. सर्वांचे आकर्षण ठरलेले प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या संगीत रजनीचा रसिक श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. सोनूच्या अनेक उडत्या चालीवरील गीतांवर युवा रसिकांनी नृत्याचा ठेका धरला. दोन तासांपेक्षा अधिक वेळ सोनूने गडचिरोलीकरांना आपल्या सप्तसुरांनी रिझवले. या कार्यक्रमाचे यू ट्यूबवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी घरूनच कार्यक्रमाचा आनंद घेणे पसंत केले. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या संगीत रजनीच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरिता मोठ्या संख्येने गडचिरोलीकर एमआयडीसी येथील मैदानावर पोहोचले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी उसळल्यामुळे आयोजकांना या लोकांची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला व कार्यक्रम न बघतात परतावे लागले. अनेक निमंत्रितांना आपल्या परिवारासह या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा होता. परंतु प्रवेश पत्र मर्यादित असल्याने बऱ्याच जणांची फजिती झाली. याचा फटका पत्रकारांच्या कुटुंबीयांनाही सहन करावा लागला. कार्यक्रमाची गर्दी पाहता सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

.