६१ लाख ७७ हजार ३३० रुपयांची दारू टाकली खड्ड्यात

124

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असते. त्याअनुसार विविध पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवाई दरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागेअभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करून ठेवणे अडचणीचे ठरत असते. त्यामुळे देसाईगंज पोलिस स्टेशन येथील सन २०२१८ ते २०२४ या कालावधीतील दाखल एकूण ५२० गुन्ह्यांमधील महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शुक्रवार (ता. २८) जेसीबी चालवून नष्ट करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार न्यायालय व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांच्या परवानगीने शुक्रवारी देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु. के. चौधरी यांच्यासह देसाईगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विविध दारूबंदी गुन्ह्यांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. यात विदेशी दारूच्या १८० मिलीच्या २६६६ बॉटल्स, विदेशी दारूची २ लिटर क्षमतेची १ बॉटल, विदेशी दारूच्या १००० मिलीच्या ६ बॉटल्स, विदेशी दारूच्या ९० मीली मापाच्या ६२ बॉटल्स, विदेशी दारूच्या ३७५ मीली मापाच्या ७ बॉटल्स, देशी दारूच्या १८० मिलीच्या २८ बॉटल्स, देशी दारूच्या ९० मिलीच्या १०१०१५ बॉटल्स, ६५० मिली बिअरच्या २९ बॉटल्स, ५०० मिली मापाचे बियरचे २४५ टिनाचे कॅन, ३३० मिली मापाचे बियरच्या ४८ बॉटल्स याप्रमाणे एकूण ६१ लाख ७७ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबीच्या सहाय्याने १५ बाय १५ फुटाचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवर बाॅटल्सचा चुरा करून खड्ड्यात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर, पोलिस उपनिरीक्षक दुर्योधन सरपे, पोलिस अंमलदार शैलेश तोरकपवार, पुंडलीक मानकर, सतीश बैलमारे यांनी पार पाडली.