छत्तीसगडचे वाहन चोर गडचिरोली पोलिसांच्या पंज्यात

83

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : जिल्ह्यात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी छत्तीसगडच्या वाहन चोरांनाही अटक केली आहे.

कोटगुल पोलिस स्टेशन येथे सोमवार (ता. २४) वानहचोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना सीसिटीव्ही फुटेजच्या मदतीने मंगळवार (ता. २५) कोटगुल पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दयानंद शिंदे यांनी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे याची ओळख पटवली होती. त्यानंतर गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगड राज्यातील टेमली येथून आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे (वय १९) रा. टेमली ता. मोहल्ला, जि. मानपूर-मोहल्ला (छत्तीसगड) याला टेमली येथून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याचा साथीदार टेमनलाल रामखिलावन साहू (वय १९) रा. चिलमगोटा ता. दौंडी लोहारा, जि. बालोद (छत्तीसगड) यांनी मिळून या गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल वाहन क्र. सी.जी-७-बी.व्ही.-५६५३, किंमत अंदाजे ३०, ००० रुपये चोरी केली असल्याचे आरोपीने पोलीसांसमक्ष कबूल केले होते. यानंतर दोन्ही आरोपींस पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यादरम्यान आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्राच्या संदर्भाने अधिकची विचारपूस केली असता कोटगुल, कोरची व छत्तीसगडमधील बसंतपूर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हे उघडकीस येऊन या गुन्ह्यांतील एकूण ३ दुचाकींसह इतर ६ दुचाकी अशा एकूण ९ दुचाकी किंमत अंदाजे ३ लाख १५ हजार रुपये आरोपींकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कोटगुल पोलिसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करून आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे हे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास कोटगुल पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दयानंद शिंदे करीत आहेत. हा तपास पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारीरवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक दयानंद शिंदे व पोलिस हवालदार भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, पोलिस अंमलदार विनय सिद्धगू, किशोर बावणे, अनिल मडावी यांनी पार पाडली.