गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ढोल- ताशाच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत निघाली महिलांची रॅली

286

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून गुढीपाडव्याच्याच दिवशी अयोध्येला परत आले. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, असे म्हटले जाते.भारतीय संस्कृतीने विश्वाला आनंदी जीवन जगायला शिकवणारी जीवन पद्धत घालून दिली आहे. त्यामुळे अशा महान संस्कृतीने ठरवून दिलेला वर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करून आपल्या संस्कृतीची माहिती व ओळख नवीन पिढीला करून द्यावी, या हेतूने आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ढोल- ताशाच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत महिलांची रॅली निघाली. भारतीय संस्कृतीचा वैभवशाली वारसा दर्शवणारी ही रॅली या सणाचे मुख्य आकर्षण ठरली.

 

आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांनी जवळपास दहा वर्षांपासून या दिवशी मराठमोळ्या वेशभूषेत महिलांची स्कूटी रॅली काढण्यास सुरुवात केली. यावर्षी महिलांची पैदल रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे यावेळेस महिलांचेच ढोल पथक तयार करण्यात आले. हे यावेळेसचे खास वैशिष्ट्य होते. ढोल पथकासाठी गीता हिंगे आणि सुनीता साळवे यांनी विशेष मेहनत घेतली. आशाप्रकारे समोर बुलेट राणी म्हणून प्रतिमा सोनुले, त्याच्या मागे घोड्यावर स्वार झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेषात अनिता दासरवार, त्यामागे भगवा ध्वज घेऊन महिला आणि त्यानंतर २० महिलांचे ढोल ताशा पथक व त्यानंतर पारंपारिक वेशभूषेतील महिला आणि रथावर आरूढ राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अशी झाकी. शिवगर्जना आणि शंख वाजवून चामोर्शी रोडवरील साई मंदिरमधून रॅलीची सुरुवात झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, अनिल तिडके, अनिल पोहनकर, चंचल काबरा, ज्योती देवकुले, वैभवी होकम यांनी रॅलीतील महिलांना शुभेच्छा देऊन रॅलीची सुरुवात केली. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीतील महिलांसाठी लॉयड्स मेटल्सकडून इंदिरा चौकात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हनुमान मंदिरासमोर किशोर सोमलकर यांच्याकडून थंड पाणी, बिस्कीट, चिक्की व त्रिमूर्ती चौक येथे शर्मा परिवार व भारत खटी यांच्याकडून फुलांचा वर्षाव करून रॅलीचे स्वागत करून सर्वांना थंड पाणी, चॉकलेट वाटप करण्यात आले. परत येताना अभिलाषा चौधरी यांच्याकडून इंदिरा चौकात केळी आणि सरबताचे आयोजन केले होते. रॅलीचा समारोप चामोर्शी रोडवरील राधे बिल्डिंग परीसरात करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे महेश काबरा यांच्याकडून रॅलीतील सर्वांसाठी नाश्त्याचे आयोजन केले होते. माजी खासदार अशोक नेते यांनीसुद्धा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रॅली पोहोचली त्यावेळेस रॅलीतील सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रशंसा केली. यावेळेस महिलांचेच ढोल पथक हा गडचिरोलीकरांसाठी कुतुहलाचा विषय होता. ढोल पथकातील सर्व महिलांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण चामोर्शी रोडवरील साई मंदिरापासून सुरुवात ते आठवडी बाजार हनुमान मंदिर पासून पुन्हा इंदिरा चौक आणि समारोप राधे बिल्डिंग इतके अंतर कमरेवर ढोल बांधून वाजवत अंतर पार करणे सोपे नव्हते. रॅलीतील सर्व महिलांना गुढीपाडव्यानिमित्त सुरेख अशी नथ भेट देण्यात आली. तसेच ढोल पथकातील सर्व महिलांचा गीता हिंगे आणि सुनीता साळवे यांनी गुढी देऊन सन्मान केला. रॅलीसाठी आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभले. रॅलीसाठी ढोल पथकाचे प्रशिक्षक दीपक जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. ढोल पथकात मिनल हेमके, दिप्ती वैद्य, योगिता दशमुखे, अलका पोहणकर, पायल नार्देलवार, राखी बेहरे, साक्षी साळवे, सीमा कन्नमवार, प्रतिमा सोनवणे, भूमिका बरडे, भारती खोब्रागडे, ज्योती सज्जनपवार, मुक्तावरम, गौरी शर्मा, मंजुषा कत्रोजवार, अर्चना कत्रोजवार,अर्चना मुनगंटीवार, मेघा कोठारे, सुनीता आलेवार, मंजुषा आंबटकर सहभागी झाल्या होत्या. तसेच रॅलीमध्ये आधारविश्व फाउंडेशन, नारी शक्ती ग्रुप, साई सेवा समितीच्या सदस्य तसेच गडचिरोली शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.