शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काॅंग्रेस करणार वैनगंगाचे पात्रात ठिय्या आंदोलन

48

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३१ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही या जिल्ह्यातील नागरिकांवर सातत्याने अन्याय होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्यायासह विविध मागण्यांसाठी जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने ५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता वैनगंगा नदीपात्रात आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सोमवार (ता.३१) पत्रकार परीषदेत दिली.

स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेला आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम, जिल्हा महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, पंकज गुड्डेवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परीषदेत माहिती देताना जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरीसारख्या मोठ्या नद्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे, तर कधी गोसेखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगड्डा धरणातील बॅक वाॅटरमुळे जिल्ह्यात वारंवार पुरस्थिती निर्माण होते व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठे नुकसान होत असते. या त्रासाला कंटाळून व झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी नदी काठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिक घेतात. मात्र गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना आता शेती करायला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सोबतच अनेक पाळीव प्राणी, वन्यप्राण्यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे, तर नदी काठावरील गावातील भूजल पातळीसुद्धा कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होत आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ८ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सह पालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र अजूनपर्यंत मागणी पूर्ण न झाल्याने गोसीखुर्द धरणातील पाणी तातडीने सोडण्यात यावे यासह जिल्ह्यातील इतर मागण्यांना घेऊन ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व गावकऱ्यांना घेऊन चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदी पात्रावरील पुलाच्या खाली ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असेही ते म्हणाले. गडचिरोली येथे होणान्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा, नेडाळा ता. चामोर्शी परीसरातील एमआयडीसीकरिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये, कोटगल बॅरेजकरिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकऱ्यांना मिळाले नसून योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा व जी शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अशा शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.