आत्मसमर्पित १०२ माओवाद्यांना विपस्सना ध्यान साधनेचे धडे

155

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे, हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून तसेच अनेक आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. अशा १०२ आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी एक दिवसीय विपस्सना ध्यान साधना शिबिर रविवार १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले.

ध्यान साधनेचा मार्ग आत्मशुद्धीचा, आत्मचिंतनाचा आणि मन:शांतीचा एक सशक्त पर्याय असल्यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस दल व धम्म वसुंधरा विपश्यना समिती वडसा, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मसमर्पित माओवाद्यांकरिता एकदिवसीय विपस्सना परिचय व आनापान ध्यान शिबिराचे आयोजन पोलिस मुख्यालय परिसरातील एकलव्य सभागृहात करण्यात आले होते. या शिबिराला १०२ आत्मसमर्पित माओवादी उपस्थित होते. गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात शांतता, विकास आणि मानवतेचा मार्ग शोधताना पोलिस प्रशासनाने नेहमीच सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. विपस्सना ही तथागत भगवान बुद्धांच्या काळातील एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावी ध्यानपद्धती असून ती मनाच्या शुद्धीसाठी आणि अंतर्मुख होण्यासाठी मार्गदर्शक ठरते. आनापान हे त्याचे एक मूलभूत आणि आरंभिक स्वरुप असून या शिबिराच्या माध्यमातून त्याचा परिचय आत्मसमर्पित माओवाद्यांना करून देण्यात आला. तसेच ज्यांना आत्मपरिवर्तनास प्रोत्साहन दिले जात आहे, अशा माओवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आवश्यक मानसिक बळ या माध्यमातून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने करण्यात आला. या शिबिरात पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, एटीएस नागपूरचे पोलिस निरीक्षक विनोद वाकडे, आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास गवते तसेच धम्म वसुंधरा विपस्सना समितीचे पुरुषोत्तम दुधे, वंदना धोंगडे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलिस कल्याण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व अंमलदारांनी सहाकार्य केले.