बसचालकास नडला; त्याला २ वर्षांच्या कारावासात धाडला

283

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : राज्य परीवहन महामंडळाच्या बसचालकाशी अरेरावी करून त्याच्यावर चाकुचे वार करत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी २ वर्षांचा कारावास व २० हजार रुपयांची. द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वृत्त असे की, प्रवीण विश्वनाथ तलांडे (( वय ३९) (एस.टी. चालक) रा. गडचिरोली जि. गडचिरोली ९ मार्च २०१९ रोजी एस.टी. बस क्र. एम.एच.-०६-सी-८८४३ या बसने सोबत वाहक रवींद्र सुधाकर पुज्जलवार यांच्यासह घोट येथे जाऊन तिथून चामोर्शी ते गोंडपिपरी, भेंडाळा, गणपूर मार्गे गोंडपिपरी मुक्कामकरिता भेंडाळा, गणपूर येथून जात असताना लोकमान्य टिळक विद्यालय, गणपूर शाळेसमोर बोरी-गणपूर जाणाऱ्या मार्गावर आरोपी सुनिल कोहपरे याने आपल्या ताब्यातील मोटारसायकल बस जाणाऱ्या रोडच्या मध्यभागी उभी ठेवून बसचे वाहन चालक यांना म्हणत होता की, “माझी गाडी ही बंद पडली आहे, मी काढू शकत नाही” असे म्हणून प्रवीण तलांडे यांच्यासोबत अरेरावी करून शिविगाळ करत होता. तेव्हा तलांडे याने आरोपीच्या गाडीला रस्त्याच्या बाजूला करतो म्हणून गाडीला हात लावला असता, आरोपी कोहपरे याने चालक तलांडे याची कॉलर पकडून खूप शिविगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देत आपल्या खिशातून चाकू काढून दोन, तीन वेळा वार करण्याचा प्रयत्न केला. चालक तलांडे याच्या उजव्या मांडीवर चाकू लागून दुखापत झाली होती. त्यावेळी वाहक रवींद्र पुज्जलवार आणि बसमधील प्रवाश्यांनी चालकास प्राथमिक आरोग्य केंद्र गणपूर रै. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे भरती केले होते. फिर्यादी, पंच व साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्र धरून मंगळवार (ता. २२) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी आरोपी सुनिल जनार्धन कोहपरे ( वय ३५), रा. गणपूर, ता. चामोर्शी जि. गडचिरोली याला दोषी ठरवून एकूण दोन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. तसेच २० हजार रुपये. दंडाची रक्कम जखमी फिर्यादीस देण्याचा आदेश पारित करण्यात आला.सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेशकुमार लिल्हारे यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गतीकरिता कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाभळे, शंकर चौधरी, सागर मुल्लेवार यांनी कामकाज पाहिले.