ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता .४ : आरोग्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत धन्वंतरी हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशलीटी सेंटरतर्फे भामरागड तालुक्यातील बिनागुंडासारख्या अतिदुर्गम भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य शिबिराचे आयोजन करत येथील आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. विशेष म्हणजे हा उपक्रम २०११ पासून आजपर्यंत यशस्वीपणे सुरू आहे. यंदाही या अतिदुर्मम गावात पोहोचण्यासाठी खाचखळगे, अनेक अडथळे पार करत प्रसंगी पायी चालत जात आरोग्यसेवा देण्यात आली.

महाराष्ट्रदिनी १ मे रोजी धन्वन्तरी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. अनंता कुंभारे यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरात आरोग्य तपासणी,औषध वितरण, कपडे वितरण, मच्छरदानी वितरण, जेवन, खाण्याचे पदार्थांचेही वितरण करण्यात आले. तसेच लहान बालकांसाठी खेळणी व कपडे आदी साहित्य वाटप करण्यात आले. या शिबिरात २०० लोकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. संपूर्ण आरोग्य तपासणी, क्ष- किरण तपासणी, नेत्र तपासणी, सर्व प्रकारची रक्त तपासणी, स्त्रीरोग रोग, दंत रोग, शरीरातील गाठींची तपासणी या शिबिरात करण्यात आली. शिबिरात धन्वन्तरी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. अनंता कुंभारे, सिटी हाॅस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. रूपाली पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रोहण कुमरे, राजू बत्तुलवार, डॉ. राकेश चहांदे, डॉ. प्रफुल्ल वाळके, डॉ. हरीश दांडेकर, डॉ. मुकेश आल्यागडे, डॉ. साई खरे, प्रमोद पळशीकर. श्याम सरदार, सिद्धार्थ कालकातवार आदींनी आरोग्यसेवा दिली. धन्वन्तरी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. अनतां कुंभारे यांनी आपले वडील ज्येष्ठ समाजसेवक डॉ .शिवनाथ कुंभारे यांचा समाजसेवेचा वारसा जपत अतिदुर्गम अशा बिनागुंडासारख्या गावांमध्ये जाऊन आरोग्यसेवा देण्याचे व्रत स्वीकारले आहे. हे व्रत ते अगदी निष्ठेने पार पाडत आहेत. जिथे जायला रस्ता नाही, वीजपुरवठा पोहोचला नाही अशा ठिकाणी प्रसंगी १८ ते २० किमी पायी चालत डाॅ. कुंभारे आणि त्यांचे सहकारी गोरगरीबांना आरोग्यसेवा देतात. यंदाही त्यांनी बिनागुंडासह कुवाकोडी, पेरमिलभट्टी, फोदेवाडा, तुर्रेमरका आदी दुर्मम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवा दिली. त्यांच्या या निस्वार्थ आरोग्यसेवेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

———————————-










