गडचिरोली, ता. २३ : अबुझमाड परीसरातील बिनागुंडा गावात कारवाई करत पोलिसांनी पाच माओवाद्यांना अटक केली होती. यातील दोन माओवाद्यांनी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा दावा खोटा ठरला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
मंगळवार (ता. २०)अबुझमाड परिसरातील बिनागुंडा येथून अटक करण्यात आलेल्या एकूण पाच माओवाद्यांपैकी दोन माओवाद्यांनी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र गुरुवार (ता. २२) त्यांची वैद्यकीय चाचणी करून आलेल्या रिपोर्टनुसार हे दोन्ही माओवादी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून आज (ता. २३) लाहेरी उप पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील या उर्वरित दोन आरोपींना अटक करण्यात आली.. राधिका बुचन्ना मडावी (सदस्य प्लाटून ३२) रा. नेंडरा ता. बासागुडा जि. बिजापुर (छत्तीसगड), पोडिया आयतू कुंजाम (सदस्य प्लाटून ३२) रा. मरतुर जि. बिजापुर (छत्तीसगड) अशी या माओवाद्यांची नावे आहेत. या दोन्ही माओवाद्यांना कायदेशीर अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांच्या समक्ष हजर केले असता दोन्ही माओवाद्यांना ४ दिवसांची पोलिस मंजूर झाली आहे.










