अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुस्क्या

76

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २६ : पोलिसांनी कौशल्याने तपास करत गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार १७ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर चेक पोस्टजवळ अज्ञात दूचाकीस्वार अंमली पदार्थ घेऊन जात असताना वाहन घसरून पडला होता. त्यावेळी पोलिस पथकाला घटनास्थळावर ९५०० किंमतीचा ४७२ ग्रॅम अंमली पदार्थ आढळला होता. यातील अज्ञात आरोपीचा गोपनीय बातमीदारांच्या व सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने शोध घेण्यात आला असता तो १७ वर्षीय अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपासादरम्यान या अल्पवयीन बालकाकडे अंमली पदार्थाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने अंमली पदार्थांचा पुरवठा करणारावनमाळी लहानू जेंगठे ( वय ४६), रा. कोसरी, ता. आरमोरी जि. गडचिरोली, असे असल्याचे सांगितले. यावरून पोलिस पथकाने पंचांसमक्ष वनमाळी लहानू जेंगठे याच्या घराची झडती घेतली असता १ किलो ४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. एकूण १४७६ ग्रॅम ३४, ५०० रुपये किंमतीचा गांजा/अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. यावरून आरोपी वनमाळी जेंगठे याला सोमवार (ता.२३) गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गडचिरोली पोलिस स्टेशन येथे १९ मे २०२५ रोजी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील संशयीत आरोपी फरार होता. मात्र गडचिरोली पोलिस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांनी आपल्या तपास कौशल्याचा वापर करून संशयीत आरोपी बालाजी अंबादास रामटेके रा. साखरा ता. व जि. गडचिरोली यास सोमवारी अटक केली. यासोबतच गडचिरोली पोलिस स्टेशन येथे सन २०२५ मध्ये गांजा अवैधपणे विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध एकूण ५ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ७ आरोपींवर कारवाई करून, एकूण दोन लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान),एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस स्टेसनचे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर, माधुरी मिसाळ, अश्विनी पाटील, दीपक चव्हाण, दीपक मोहिते, पोलिस अंमलदार धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, नरेश मेश्राम, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्राागडे, राजेंद्र पुरी, ताजूद्दीन गोवर्धन, अतुल भैसारे, मनोज कन्नाके, फोटोग्राफर पिदूरकर, संतोष नादरगे यांनी पार पाडली.