ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. २८ :सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या तसेच ६ लाख रुपयांचे शासनाचे बक्षिस असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफने शुक्रवार (ता. २७) शिताफीने अटक केली आहे. अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (उप-कमांडर, कोरची दलम), (वय २८), रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचे नाव आहे. विशेष म्हणजे गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी कारवायांमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण १०४ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी कवंडे जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची दोन पथके, कवंडे येथील पोलिस पथक आणि सीआरपीएफच्या सी कंपनी ३७ बटालियनचे एक पथक माओवादविरोधी अभियान राबवत असताना त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आली. पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी गडचिरोली पोलिस मुख्यालयात आणले असता तो जहाल माओवादी असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, हा माओवादी पोलिसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो कवंडे जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. तसेच पोलिस तपासात उघड झाले की, या माओवाद्याचा १ मे २०१९ रोजी कुरखेडा उपविभागाअंतर्गत जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात १५ पोलिस जवानांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. जहाल माओवादी अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो यास २९ मार्च २०२१ रोजी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये खोब्राामेढा जंगल परिसरात झालेल्या चकमकीवरुन पुराडा पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हायत रात्री उशीरा अटक करण्यात आली. कुरखेडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिका यांनी त्यास ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर आजपर्यंत ३ चकमक व २ खून असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. सन २०१२ मध्ये निब कंपनी (छत्तीसगड) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन त्याने सन २०१७ पर्यंत काम केले, सन २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर काही महिने काम केले, सन २०१७ ते २०२० पर्यंत कोरची दलममध्ये उप-कमांडर पदावर काम केले, सन २०२० पासून आजपर्यंत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कवंडे जंगल परिसरात राहून आपले अस्तित्व लपवून पोलिसांची माहिती मिळवण्याचे काम करत होता. महाराष्ट्र शासनाने अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट ३७ बटालियन सीआरपीएफ दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक तसेच सीआरपीएफ ३७ बटालियन सी-कंपनीचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून शरणागती पत्करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
———————————-










