जिल्ह्यात पावसाने केला कहर; जनजीवन विस्कळीत

45

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ९ : जिल्ह्यात पावसाने कहर केला असून मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या इशारा पातळीजवळ वाहत असून जिल्ह्यातील १९ मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत.

गडचिरोली जिल्ह्याला दरवर्षी पावसामुळे मोठे नुकसान झेलावे लागते. यंदाही जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देसाईगंज, कुरखेडा उपविभागातील १९ मार्गांवरील रहदारी बंद झाली आहे. सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. सोबतच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातील मुख्य वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आणखी काही मार्ग बंद होऊ शकतात. तर अनेक नद्या इशारा पातळीच्याजवळ पोहोचल्या आहे. खबरदारी म्हणून जिल्हा व राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूला तयारीची सूचना देण्यात आली आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा कुरखेडा तालुक्याला बसलेला आहे. येंगलखेडा लघु सिंचन प्रकल्पदेखील भरल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत पूरस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती निवारणासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसासोबतच गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना घाबरू नका, पण सतर्क राहा असे आवाहन करत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेची उपाययोजना राबविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. पूलावरून पाणी वाहत असल्यास तिथे मोटारसायकलने जाणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, तसेच नदी प्रवाह पाहण्यासाठी पर्यटन व सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णतः टाळण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे. पोलिस विभागाने धोकादायक भागांमध्ये बॅरिकेटिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कुरखेडा-मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ (खोब्रागडी नदी), कोरची-बोटेकसा-भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ (भीमपूर नाला), कुरखेडा-वैरागड-रस्ता राज्यमार्ग ३७७ , मांगदा ते कलकुली, कढोली ते उराडी, चातगाव-रांगी-पिसेवाडा रस्ता, गोठनगडी- चांदागड-सोनसरी रस्ता, कुरखेडा-तळेगाव-चारभट्टी, आंधळी-नैनपुर, शंकरपूर-जोगीसाखरा-कोरेगाव चोप, आष्टी-उसेगाव- कोकडी-तुळशी- कोरेगाव, मालेवाडा-खोब्रामेंढा, वैरागड-देलनवाडी, चौडमपल्ली-चपराळा, सावरगाव-गारपट्टी- कोटगुल, अरसोडा-कोंढाळा-कुरूड- वडसा आदी मार्ग बंद झाले आहेत. विशेष म्हणजे गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्ग पाल नदीमुळे वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे.

—————————