डॉ. बाहुबली शहांचे यांच्या उपोषणाला गडचिरोलीच्या होमिओपॅथी डाॅक्टरांचा पाठींबा

206

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १४ : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक, ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉ. बाहुबली शहा यांनी १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील होमिपॅथी डाॅक्टरांचा पाठींबा असल्याची माहिती सोमवार (ता. १४) पत्रकार परीषदेत देण्यात आली.

स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत जिल्ह्यातील होमिओपॅथीचे डाॅक्टर्स म्हणाले की, सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील (MMC) नोंदणीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात येणार आहे. डॉ. शहांच्या या भूमिकेला राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे सीसीएमपीधारक डॉक्टर आणि आयएमए यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. डॉ. शहा यांचा आरोप आहे की, आयएमएने सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या नोंदणीबाबत ‘खोट्या व अर्धसत्य माहिती’ च्या आधारावर प्रसारमाध्यमे, आंदोलने आणि मोर्चांद्वारे राज्य शासन व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर दबाव आणला आहे. यामुळे सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला आहे. या दबावामुळेच, एमएमसीने गेली आठ वर्षे कायद्याची पायमल्ली करत सीसीएमपी अर्हताधारकांची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली असल्याचा डॉ. शहा यांचा दावा आहे. सीसीएमपी अभ्यासक्रम हा महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या कायद्यानुसार तयार करण्यात आला असून, त्याला शासनाची पूर्ण मान्यता आहे. २०१७ पासून हजारो डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा अभ्यासक्रम साडेपाच वर्षांच्या एमबीबीएस समतुल्य होमिओपॅथी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एक वर्षाचा क्लिनिकल रोटेशन आणि प्रात्यक्षिकासह आधुनिक चिकित्सा पद्धतीतील औषधशास्त्राचा अभ्यासक्रम समाविष्ट करतो. त्यामुळे हे डॉक्टर आधुनिक चिकित्सा पद्धतीनेही रुग्णोपचार करण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयएमएने हा कायदा किंवा अभ्यासक्रम रद्द करण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. डॉ. शहा यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे आपल्या आमरण उपोषणाची माहिती दिली आहे. ‘होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन’ या नावाने हे उपोषण करण्यात येणार आहे. त्यांच्या या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डाॅक्टरांचा पूर्ण पाठींबा असल्याचे पत्रकार परीषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परीषदेला डॉ तामदेव दुधवळे ,डॉ वरुण राव दूधवळे ,डॉ सत्यविजय दूधवळे, डॉ गणेश सातपुते , ,डॉ संदिप भांडेकर,डॉ सुशिल शेंडे, डॉ अचिंत्य विश्वास , डॉ कमलाकर शेंडे , डॉ आर डी मुनघाटे, डॉ के व्ही कोहळे, डॉ प्रणित बॅनर्जी, डॉ संदीप ठाकरे, डॉ प्रमोद धडरे, डॉ मिथुन रायशिडाम, डॉ रवींद्र पाधर, डॉ रवी बुल्लीवार आदींची उपस्थिती होती.

—————————————-