Home Gadchiroli पोलिसांनी चारचाकी वाहनासह लाखोंचा दारूसाठा केला जप्त

पोलिसांनी चारचाकी वाहनासह लाखोंचा दारूसाठा केला जप्त

289

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार (ता. २०) सापळा रचून अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करत अवैध दारू व चारचाकी वाहनासह ६ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार मनोज वामन ऊईके रा. शिवणी, ता जि. गडचिरोली हा त्याच्या स्वत:च्या स्विफ्ट या चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी- विदेशी दारूची गडचिरोली शहरामध्ये वाहतूक करत आहे, अशी माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली-चामोर्शी रोडवरील सेमाना मंदिराजवळ सापळा रचला असता संशयित चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी या वाहनाला थांबण्याचा इशारा करून रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यानंतर वाहनाच्या चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव मनोज वामन ऊईके रा. शिवणी, ता. जि. गडचिरोली असे सांगितले. त्यानंतर वाहन चालकास वाहन अडविण्याचे कारण सांगून पोलिस पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात २५ पेट्या देशी दारूचे बॉक्स, ४ पेट्या विदेशी बियरचे बॉक्स आढळले. हा मुद्देमाल व एक मारुती सुझुकी कंपनीचे स्विफ्ट चार चाकी वाहन असा एकूण ६ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आला. या मुद्देमालाबाबत वाहन चालकाकडे अधिक विचारपूस केली असता हा मुद्देमाल किरण ताटपल्लीवार आणि लंकेस यांच्याकडून घेतला आहे असे त्याने सांगितले. यावरून संबंधीत घटनेच्या अनुषंगाने आरोपी मनोज ऊईके, किरण ताटपल्लीवार व लखन ऊर्फ लंकेस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी मनोज ऊईके याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार कैलास नरोटे हे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलिस हवालदार दंडीकवार, पोलिस अंमलदार पंचफुलीवार व कोडाप यांनी पार पाडली.

——————————————–