ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २९ : संयुक्त राष्ट्रात दहशतवादाला रोखण्यासाठी ईडी कायदा निर्माण झाला. पण भारतात ईडीला राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरले जात आहे. असाच गैरवापर विशेष जनसुरक्षा कायद्याचाही होईल, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवार (ता. २९) पत्रकार परीषदेत केला.
स्थानिक सर्कीट हाऊस विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत देशमुख म्हणाले की, दहशतवादाला मिळणाऱ्या पाठबळाला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रात ‘ईडी’ सारखा कायदा निर्माण करण्यात आला होता. भारतात २००४ मध्ये हा कायदा अंमलात आला. परंतु या कायद्याचा वापर राजकीय सूड उगवण्यासाठी करण्यात येत आहे. नुकताच राज्याच्या विधिमंडळात सत्ताधाऱ्यांनी पाशवी बहुमताच्या जोरावर विशेष जनसुरक्षा विधेयक पारीत केले. येणाऱ्या काळात या कायद्याचा वापर सत्तेच्या विरोधात मत प्रदर्शन करणारे राजकीय नेते, शेतकरी, चळवळीतील कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या विरोधात होणार आहे. ‘ईडी’च्या गैरवापरासंदर्भात यासंदर्भात नुकतेच सरन्यायाधीशांनी फटकारल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून शेतकरी कर्जमाफी करू असे सांगितले होते. सत्तेत आल्यानंतर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. धानाला आधारभूत किंमत नाही. ८० टक्के शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही. खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येत आहे. पोलिसांवर हल्ले वाढले, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिला अत्याचाराविरोधात आघाडी सरकारने आणलेला शक्ती कायद्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे.राज्यातील कंत्राटदारांची ९० हजार कोटींचे देयके अद्याप मिळालेली नाही. आता कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. पीक विम्याकरिता चुकीचे निकष लावण्यात आले. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. असे शेकडो गंभीर प्रश्न सरकार समोर असताना ते सोडविण्याऐवजी सत्ताधारी राजकारणात व्यस्त आहेत. उलट वादग्रस्त मंत्र्यांना अभय दिले जाते. असा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, सरचिटणीस सुरेश पोरेड्डीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
——————————–










